‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व काही दिवसांपूर्वीच संपलं. या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी त्यांच्या वागणुकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर शिव ठाकरे आणि पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन यांच्यामध्ये ट्रॉफीसाठी चढाओढ रंगली. या दोघांपैकी एमसी स्टॅनने बाजी मारत ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या कार्यक्रमामुळे त्याचा चाहता वर्ग खूपच वाढला. अनेक कलाकारांच्या तोंडीही त्याचं नाव आता ऐकू येतं. पण आता राखी सावंतने त्याचं नाव चुकीचं उच्चारलं आहे.
हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून एमसी स्टॅनचं नक्की नाव काय आहे हे तिला माहीत नसल्याचं दिसतंय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राखी सावंत उत्साहाने पापराझींना तिच्या महागडे सँडल दाखवताना दिसते. त्यावर एक मीडिया फोटोग्राफर तिला म्हणतो, “८० हजाराचे आहेत हे शूज.” त्यावर राखी म्हणते, “तो कोण आपला स्टॅण्ड?” इतक्यात कोणीतरी म्हणतं एमसी स्टॅन. त्यावर राखी म्हणते, “हो एमसी स्टॅण्ड. बघ आपले शूज सारखे आहेत ८० हजाराचे. सारखीच किंमत. एमसी स्टॅण्डसारखी. तो स्टॅण्ड आहे का?” त्यावर तिला कोणीतरी सांगतं, “एमसी स्टॅन.” त्यावर लगेच राखी म्हणते, “कोणताही स्टॅन्ड असो मुलगा चांगला आहे.”
आता तिचा हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिला तिच्या नाटकीपणामुळे ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिने एमसी स्टॅनचं नाव चुकीचं उच्चारल्यानेही तिच्यावर निशाणा साधला आहे.