हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या अतरंगी वागण्याबरोबरच तिच्या कपड्यांमुळे देखील ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर आतापर्यंत अनेकांनी तिचा उल्लेख पॉर्नस्टार असाही केला आहे. आता राखीने त्याला उत्तर दिलं आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात तिने आदिल खानशी लग्न केलं. पण त्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप करत त्याला तुरुंगात पाठवलं. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर आदिलने देखील त्याची बाजू मांडत राखीवर अनेक आरोप केले. त्यानंतर राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लोकांनी तिचा उल्लेख पॉर्नस्टार असा करण्यावर भाष्य केलं.
‘फिल्मग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी पॉर्नस्टार कधी झाले? पॉर्नस्टारचा अर्थ काय, शारीरिक संबंध ठेवणं, अवैध संबंध ठेवणं, अंगप्रदर्शन करणं. मी आतापर्यंत असं कधीही काहीही केलेलं नाही. जर आदिलबरोबर मी शारीरिक संबंध ठेवले तर त्याच्याबरोबरच मी लग्न केलं. त्यावेळी मी त्याची जात, धर्म काहीही पाहिलं नाही. आमच्याकडून चूक झाली आम्ही लग्न केलं. ज्या खऱ्या पॉर्नस्टार असतात त्यांची तर तुम्ही दिव्यांनी आरती ओवाळता आणि जी साधी मुलगी आहे तिला पॉर्नस्टार बनवून टाकता. छान. धन्यवाद. मी सगळं मान्य करेन, पण मी पॉर्नस्टार आहे हे म्हणणं मी कधीही मान्य करणार नाही. हा आरोप मी माझ्यावर लावून घेणार नाही. मी पॉर्नस्टार नाही.”
दरम्यान, राखी आणि आदिल यांच्यामधील वाद आता पुन्हा चर्चेत आले आहेत. फक्त आदिलच नाही तर राखीची खास मैत्रिणी राजश्री तिनेही राखीवर अनेक आरोप केले आहेत. आदिल खान, राजश्री आणि शर्लीन चोप्रा आता राखीविरुद्ध एकत्र आले आहेत.