राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांच्यात वाद सुरू आहे. राखीने आदिलवर मारहाणीचे आरोप केले आणि त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर आदिलला अटक करण्यात आली, सुरुवातीला त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, नंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता राखीने याबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.
“मी राखी सावंत उर्फ फातिमा आदिल खान दुर्रानी पुन्हा उठून उभी राहीन, बिझनेस करेन, बिझनेस वूमन बनेन. हार मानणार नाही. शून्यातून उठून पुन्हा उभी राहीन, मी कमकुवत नाही, अबला नाही, मी लढेन. एकच आयुष्य आहे, आयुष्यात चढ-उतार येत राहतात. आज अंधार आहे, पण उद्या आयुष्यात प्रकाश असेल,” असं राखी म्हणाली.
यानंतर तिने गाणं गात तिच्या आयुष्याची व्यथा मांडली. “या जगात कोणीच कोणाचं नाही, सर्व नाती खोटी आहेत. आदिल तू खूप खोटा बोललास, तूने माझं हृदय तोडलंस,” असं राखी म्हणाली.
राखी सावंतने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. आदिलचं पहिलं लग्न झालं होतं, पण त्याने तिच्यापासून घटस्फोट न घेताच आपल्याशी दुसरं लग्न केल्याचा खुलासाही तिने केला होता.