छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. अशातच टीआरपीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या सगळ्याच वाहिन्यांमध्ये चढाओढ निर्माण झालेली आहे. नवनवीन पात्रांच्या एन्ट्री, मालिकेतील ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांच्या मनात आगामी भागांबद्दल उत्सुकता निर्माण होते. सध्या अशाच एका मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिकेत लवकरच एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. गेल्या महिन्यात मालिकेत रमा आणि राघव यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. परंतु, लग्नानंतर देखील रमा-राघवच्या आयुष्यातील विघ्न काही केल्या संपत नाहीयेत.
रमा-राघवला आता राहत्या घरातून बाहेर निघून नव्याने आपला संसार थाटावा लागणार आहे. अशातच दोघांच्या आयुष्यात एक नवीन विघ्न येणार आहे. मालिकेत लवकरच ‘अग्गबाई सुनबाई’ फेम अभिनेता अद्वैत दादरकरची एन्ट्री होणार आहे.
“नवीन काम…नवीन ऊर्जा…आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या. रमा राघवचा अटळ वनवास, नात्यांच्या अग्निपरीक्षेचा प्रवास” असं कॅप्शन देत अद्वैतने मालिकेता नवीन प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान, ‘रमा राघव’चा हा नवीन प्रवास ६ मे पासून प्रेक्षकांना रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.