मराठी कलाविश्वात सध्या जोरदार लग्नसराई सुरू आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. नुकतीच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंदी टिकेकर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आज ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार लग्नबंधनात अडकली आहे.
अभिनेत्री सोनल पवारने नोव्हेंबर महिन्यात समीर पालुष्टेबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला होता. तेव्हापासून सोनल कधी लग्नबंधनात अडकणार, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज, २८ डिसेंबरला सोनलने समीरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा सोनलचा पार पडला आहे. सध्या अनेक कलाकार मंडळी तिला आणि तिच्या नवऱ्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सोनलने लग्नाचे फोटो, व्हिडीओ स्वतः सोशल मीडियावर अजून शेअर केले नाहीत. पण तिच्या लग्नाचे विधींचे फोटो, व्हिडीओ अनेक इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. लग्नात सोनलने जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. त्यावर भरजरी दागिने परिधान केले होते. तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर सोनलच्या नऊवारीला मॅच करण्यासाठी जांभळ्या रंगाचा शॉल घेतला होता. दोघं लग्नात खूपच सुंदर दिसत होते. सोनलच्या लग्नातील लूकचा व्हिडीओ ‘चंद्रकलाम ज्वेलरी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
सोनलचा नवरा कोण आहे?
सोनलचा नवरा समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे. तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे. तसेच समीर डिजिटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो. विशेष म्हणजे सोनलच्या नवऱ्याला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा – “बायको असशील घरी…,” नवविवाहित गौतमी देशपांडेला पती असं का म्हणाला? पोस्ट चर्चेत
दरम्यान, सोनलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘रमा राघव’ व्यतिरिक्त ‘तुला पाहते रे’, ‘घाडगे अॅण्ड सून’ या मालिकेमध्ये काम केलं आहे. तिची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती.