‘मुरांबा’ (Muramba) मालिका ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकापैकी एक आहे. या मालिकेत आतापर्यंत रेवा आणि रमाच्या मैत्रीपासून ते त्यांच्या शत्रुत्वापर्यंतची गोष्ट पाहायला मिळाली. एकेकाळी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असलेल्या रेवा आणि रमा आता मात्र एकमेकींच्या सर्वांत मोठ्या शत्रू झालेल्या दिसत आहेत. आता स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने इन्स्टाग्रामवर ‘मुरांबा’चा एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला, रेवाने हाताला मेंदी लावली आहे. तिच्या हातात रमाचे रमाक्षय लिहिलेले मंगळसूत्र आहे. रमा तिच्या जवळून जात असताना रेवा, “मंगळसूत्र एक्स्पायर झालंय. कारण- अक्षयचं नाव माझ्या हातावरच्या मेंदीत लिहिलंय”, असं म्हणून रमाचं मंगळसूत्र चिखलात फेकते. त्यानंतर रमा रेवाच्या जवळ येते आणि म्हणते, “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस त्याच हातांनी उचलून दे. नाही तर त्यांना आता जाऊन सांगेन की, मी त्यांची बायको आहे.” हे ऐकल्यानंतर रेवा घाबरलेली दिसत आहे. ती मेंदीचा हात चिखलात घालून ते मंगळसूत्र काढते. रमा रेवाला त्या मंगळसूत्रावरील चिखल पुसण्याचा इशारा करते. रेवा तिच्या ओढणीनं त्या मंगळसूत्रावरील चिखल पुसते. हे सगळं करताना तिची मेंदी खराब होते. मग रमा रेवाला म्हणते, “नाव मेंदीवर असून चालत नाही; हातांच्या रेषांवरसुद्धा असावं लागतं.”
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर…”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा प्रोमो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत मालिकेचे कौतुक केले आहे. “अक्षयने अपेक्षा केली होती, तसा बदल रमामध्ये झाला आहे. खूप छान रमा”, “आता रमाकडून हेच अपेक्षित आहे. मिळमिळीत, सोशीक नको. पुढेसुद्धा खमकी, खंबीर रमाच पाहायची आहे”, “रमाचं बरोबर आहे”, “छान रमा”, “लेखकाला सलाम”, असे म्हणत नेटकऱ्यांनी मालिकेचे कौतुक केले आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रेवाने अक्षयला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो; मात्र तो वाचतो आणि त्याच्या डोक्याला मार लागतो. अक्षय रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी मागचे काहीही आठवत नसल्याचे नाटक करतो. या सगळ्यात त्यांचे लग्न ठरते. काही दिवसांपूर्वीच अक्षयने रमाला रेवाबरोबरचे लग्न मोडून तुझ्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करीन, असे म्हटले आहे. तिला प्रपोजदेखील केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मालिकेत आता पुढे काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.