‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे सध्या देशभरातील वातावरण गढूळ झालं आहे. चित्रपटाचं सादरीकरण, संवाद अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. इतकंच नव्हे तर ‘रामायणा’चा अपमान करणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालायची मागणी सगळीकडून होताना दिसत आहे. या चित्रपटावर टीका करताना बरीच मंडळी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेचे संदर्भ आणि दाखले देत आहेत.
मात्र ही गोष्ट तुम्हाला ठाऊक नसेल की ‘आदिपुरुष’ किंवा इतर काही बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेवरही २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. १९८७ मध्ये ‘रामायण’ सीरिजचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. ३६ वर्षांनीही आज या ७८ भागांच्या मालिकेचे प्रत्येकजण आठवण काढत आहे, पण ही मालिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल २ वर्षं सरकारी कचेरीचे उंबरे झिजवले होते.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ लवकरच बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार? नवव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
रामानंद सागर यांचे सुपुत्र प्रेम सागर यांनी त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी या मालिकेशी जोडलेल्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. ही मालिका दाखवण्यासाठी दूरदर्शनचे मालक आणि सरकार दोन्हीकडून विरोध होत होता. इतकंच नव्हे तर रामानंद सागर यांनी तयार केलेले ३ पायलट एपिसोडही तेव्हा नाकारण्यात आले होते.
यानंतर तब्बल २ वर्ष यामागे हात धुवून लागल्यावर ही मालिका प्रसारित करायची परवानगी मिळाली होती. ‘रामायण’मधील अभिनेते सुनील लहरी यांनीही सांगितलं की ज्याप्रमाणे ‘आदिपुरुष’ला विरोध होत आहे तसाच विरोध त्याकाळी ‘रामायण’ मालिकेला झाला होता. सीतेला स्लीवलेस ब्लाऊज परिधान केल्याचं दाखवल्याने दूरदर्शन आणि तेव्हाच्या सरकारने या मालिकेवर आक्षेप घेतला असल्याचंही सुनील लहरी यांनी स्पष्ट केलं.
एवढं होऊनही रामानंद सागर यांनी हार मानली नाही. सीतेच्या भूमिकेत काम करणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्या वेशभूषेवर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं. या सगळ्यासाठी त्यावेळी त्यांना तब्बल दोन वर्षं लागली. तोपर्यंत या मालिकेचं प्रसारण थांबवण्याचे आदेश होते. यानंतर जेव्हा नव्या रूपात ‘रामायण’ मालिका प्रसारित झाली तेव्हा मात्र प्रेक्षकांनी त्यावर भरभरून प्रेम केलं. आजही ‘आदिपुरुष’ ऐवजी रामानंद सागर यांचे ‘रामायण’च उत्तम असं म्हणणारे कित्येक लोक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील.