रामायण या मालिकेत सीता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखलिया. सीतेचं पात्र त्यांनी आपल्या भूमिकेतून अजरामर केलं आहे. आजही सीता म्हटलं की त्यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो. त्यांना विशेष अतिथी म्हणून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात निमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी राम मंदिराच्या अनुषंगाने दीपिका चिखलिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास विनंती केली आहे.
२२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस आहे
२२ जानेवारी हा दिवस ऐतिहासिक आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ५०० वर्षांनी प्रभूरामचंद्र अयोध्येत येत आहेत. आपल्या घरी येत आहेत. मी राममयी झाले आहे. माझी प्रभू रामचंद्रांवर प्रचंड श्रद्धा आहे. मी सीतेची भूमिका केली यासाठी स्वतःला भाग्यवान समजते. माझ्यासाठी २२ जानेवारीचा दिवस ऐतिहासिक आहे आणि भावनिक करणाराही आहे. सगळ्या भारतीयांसाठी तो गौरवाचा क्षण असणार आहे असं दीपिका चिखलिया यांनी म्हटलं आहे.
मला वाटलं नव्हतं की निमंत्रण मिळेल
मला राम मंदिराच्या सोहळ्याचं निमंत्रण मिळेल असं वाटलं नव्हतं. मला संघाच्या कार्यालयातून फोन आला. त्यांनी मला सांगितलं आमच्यासाठी तुम्ही सीताच आहात. तुम्हाला सगळं जग सीता म्हणूनच ओळखतं. त्यामुळे आमचं निमंत्रण स्वीकारा. मला तेव्हा खूप आनंद झाला. मी त्यांना परत विचारलं तुम्ही मला सीता समजता का? त्यावर ते म्हणाले हो याबाबत आमच्या मनात काही शंकाच नाही. त्यावेळी मला निमंत्रण मिळाल्याचा खूप आनंद झाला असंही दीपिका यांनी म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी विनंती आहे…
यानंतर दीपिका चिखलिया म्हणाल्या, “अयोध्येतील राम मंदिरात रामाचीच मूर्ती असणार आहे सीतेची नाही. हे समजल्यावर मला वाईट वाटलं. मला हे नेहमीच वाटत होतं की राम मंदिर उभं राहतं आहे तर तिथे रामाची आणि सीतेची मूर्ती बरोबर असेल. मात्र असं नाही याचं मला खूप वाईट वाटतं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करु इच्छिते की रामाच्या मूर्तीसह तिथे सीतेचीही मूर्ती असावी. राम आणि सीता यांची मूर्ती विराजमान होईल अशी जागा असणारच. मी कळकळीची विनंती करते की प्रभू रामचंद्रांची एकट्याची मूर्ती ठेवू नका. अयोध्येत रामाची पूजा रामलल्ला म्हणजेच बालरुपात केली जाते हे मला माहीत आहे. मात्र रामाच्या मूर्तीसह सीतामाता असेल तर माझ्यासह सगळ्याच महिलांना खूप आनंद होईल.” असं दीपिका चिखलिया यांनी म्हटलं आहे.