Rang Maza Vegala Fame Actress : ‘रंग माझा वेगळा’ या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकेने जवळपास ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरांत लोकप्रिय झाली होती. नुकताच या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. रेश्मा-पवन २९ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकले. आता रेश्मा पाठोपाठ या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.
गेल्या काही दिवसांत रेश्मासह, किरण गायकवाड, शाल्व किंजवडेकर, निखिल राजेशिर्के, कौमुदी वलोकर असे बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री सोनाली साळुंखे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचा पार पडला लग्नसोहळा
सोनालीचा लग्नसोहळा २४ डिसेंबरला थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्री ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. यामध्ये तिने अनिताची भूमिका साकारली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. लग्नाचे फोटो शेअर करत तिने लोकेशनमध्ये धुळे शहराचं नाव नमूद केलं आहे. यावरून अभिनेत्रीचा लग्नसोहळा धुळ्यात पार पडल्याचं स्पष्ट होत आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा यावर्षी एप्रिल महिन्यात धुळे येथेच पार पडला होता. आता सोनालीने लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
अभिनेत्री सोनाली साळुंखेने आजवर ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’, ‘रंग माझा वेगळा’, ‘गाथा नवनाथांची’, ‘विघ्नहर्ता गणेशा’ अशा विविध मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने रंगभूमीवर देखील काम केलेलं आहे. आता आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत सोनाली लग्नबंधनात अडकली आहे.
हेही वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळीला ‘या’ गोष्टीचे व्यसन; खुलासा करत म्हणाली, “त्रास होतोय पण…”
सोनालीचा लग्नसोहळा धुळ्यात थाटामाटात पार पडला. विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने यावर ‘२४-१२-२४’ असं कॅप्शन दिलं आहे. तिने लग्नात रॉयल लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.