मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर साडे चार वर्ष अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांच्या यादीत या मालिकेचं नाव सामील होतं. अभिनेत्री रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा अतुल, विदिशा म्हसकर, अभिज्ञा भावे असे अनेक तगडे कलाकार मंडळी झळकलेल्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यामुळे अजूनही या मालिकेची चर्चा असते. याच मालिकेतील अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आदित्य म्हणून झळकलेला अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजीवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनारशी अंबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींला सुरुवात झाली आहे. आता अंबर गणपुळेला हळद लागली आहे. अंबरच्या मित्रमंडळींनी हळदी समारंभाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अंबर पिवळ्या रंगाचा सदरा, पांढरा पायजमा आणि डोक्यावर टोपी अशा लूकमध्ये पाहायला मिळत आहे. कुटुंबातील सदस्य अंबरला हळद लावताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्याचा आनंद त्याच्या चेहरावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काल १७ जानेवारीला अंबरची होणारी पत्नी शिवानी सोनारचा ‘अष्टवर’ विधी पार पडला. या विधीसाठी शिवानीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. शिवानीचे ‘अष्टवर’ विधीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
अंबर-शिवानीची लव्हस्टोरी
अंबर गणपुळे आणि शिवानी सोनारची पहिली भेट पुण्यात झाली होती. शिवानी पुण्यात असताना अंबर सतत तिला कधी नाटकाच्या प्रयोगाला तर कधी कोणाच्या तरी लग्नात भेटायचा. पण, यावेळी दोघांची मैत्री नव्हती. मात्र या दिवसांत दोघांच्या एका कॉमन मित्राला एक शॉर्ट फिल्म करायची होती. त्या मित्राला अंबर आणि शिवानीलाच एकत्र घेऊनच शॉर्ट फिल्म करायची होती. याच शॉर्टफिल्मच्या वेळी अंबर आणि शिवानी एकमेकांच्या चांगले मित्र झाले. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत.