गेल्या काही दिवसांपासून ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री आणि भगरे गुरुचींची कन्या अनघा अतुल हिच्या नव्या हॉटेलची जोरदार चर्चा आहे. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलच नाव असून पुण्यातील डेक्कन परिसरात १९ ऑक्टोबरला हे हॉटेल सुरू करण्यात आलं. अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे या दोघांनी मिळून या हॉटेलची जबाबदारी घेतली आहे.
अनघाच्या या नव्या हॉटेलमध्ये अनेक मराठी कलाकार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. त्यामुळे खवय्ये येथे शुद्ध शाकाहारी अशा पारंपरिक थाळीचा आस्वाद घेत आहेत. अशातच अनघाने यापूर्वी सुरू केलेल्या पहिल्या हॉटेलविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. या हॉटेलमुळे अनघासह तिच्या कुटुंबीयांचं मोठ आर्थिक नुकसान झालं होतं.
हेही वाचा – Video: ‘टायगर ३’ चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ लीक; सलमान खानला वाचवण्यासाठी बादशाहची खतरनाक एन्ट्री
‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलला अनघा अतुलने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने हॉटेल व्यवसायातील अनुभव सांगितला. तसंच तिने पहिल्या हॉटेलचा किस्सा सुद्धा सांगितला. अनघा म्हणाली, “हे मी अजूनपर्यंत कुठे बोलली नाही. पण २०२०मध्ये ‘वदनी कवळ’ सुरू केलं होतं. १५ मार्च २०२० रोजी बाणेरमध्ये पहिलं हॉटेल सुरू केलं होतं. पूजा वगैरे सगळं झालं. तेव्हा बाणेरमधील चांगल्या परिसरात दोन मजली हॉटेल होतं. खूप खर्च केला होता. त्यावेळेस पंजाबी थाळी, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन थाळी असं सगळं ठेवण्यात आलं होतं. हॉटेल १५ मार्चला सुरू केल्यानंतर २० मार्चला लॉकडाऊन झालं. त्यामुळे आम्हाला ही बाजू एक्स्प्लोर करताच आली नाही. लोकांना सर्व्ह करता आलं नाही.”
पुढे अनघा म्हणाली, “हा एक लॉकडाऊन नाही तर लागोपाठ तीन लॉकडाऊन झाले. म्हणून वर्षभरात हे हॉटेल बंद करावं लागलं. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला. आम्ही त्यातून रिकव्हर होताना खूप विचार केला. हॉटेल विकण्याचा देखील विचार केला होता. पण कुठेतरी वाटतं होतं की, आपण ज्या व्यवसायात अनुभवच घेतला नाही. तर आपण त्यातून माघार कशी घेऊ शकतो? अखिलेशच्या डोक्यात आलं की, जे सामान आहे, ते वाया घालवायचं नाही. त्याच्या मदतीने आपण काहीतरी करून या. कारण ते आपलं आहे. मग तिथून या हॉटेलसाठी सुरुवात झाली. या जागेवर आम्हाला जास्त खर्च करावा लागला नाही.”