‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका चांगलीच गाजली. या मालिकेनं चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सप्टेंबर २०२३मध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील कलाकार आता नवनवीन भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील खलनायिका श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुलनं नुकतीच वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची मुलगी अनघा आहे. आज भगरे गुरुजींचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं अनघानं वडिलांबरोबरचा सुंदर फोटो शेअर करून खास पोस्ट लिहिली आहे.

अनघा अतुलनं वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, “माझ्या सर्वकाहीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबा, तुम्ही नेहमी प्रेरणा आणि प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सारखा दुसरा कोणीही असू शकत नाही. तुमच्या कठोर परिश्रमामुळे मी स्थिर राहतं आहे. तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी मी शुभेच्छा देते. आपको मेरी उमर लग जाए और क्या कहु.”

अनघाच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भगरे गुरुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकन्या मोने, सिद्धार्थ बोडके, ऋतुजा बागवे, भक्ती रत्नपारखी या कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “आमच्या दिवसाची सुरुवात गुरुजींच्या कार्यक्रमानं होते आणि अशा हसमुख गुरुजींना वाढदिवसानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आजचा दिवस अतिशय तेजोमय आहे. अतिशय आल्हाददायक अशी प्रसन्नता व समाधान तुमच्या दारासमोर असेल. शनी व राहू यांची परीक्षा संपली असल्यामुळे ते काही काळ सुट्टीवर असतील…साडेसाती संपून प्रगतीकडे वाटचाल होईल…अगदी आनंद आणि आनंदाचा दिवस आहे…अशा या मंगलमय दिनाच्या आपल्यास शुभेच्छा.”

दरम्यान, अनघा अतुलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिचं ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. अद्वैत दादरकर लिखित-दिग्दर्शित या नाटकात अनघासह प्रशांत दामले, हृषिकेश शेलार, समृद्धी मोहरीर, सुशील इनामदार, चिन्मय माहूरकर पाहायला मिळत आहेत. याशिवाय अनघाचा ‘छबी’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अद्वैत मसुरकर दिग्दर्शित ‘छबी’ चित्रपटात ध्रुव छेडा, समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, लीना पंडित असे बरेच कलाकार मंडळीत आहेत. ९ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.