महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर, सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे अशा मराठी मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये अभिनय क्षेत्र सांभाळून स्वत:चे नवे व्यवसाय सुरू केल्याचं आपण पाहिलं. या यादीत काही दिवसांपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री आणि भगरे गुरुजींची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनघा अतुलचं नाव जोडलं गेलं.
अनघा अतुलने पुण्यात गेल्या महिन्यात आपल्या भावाच्या साथीने ‘वदनी कवळं’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू केलं. यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. सध्या तिच्या हॉटेलची मराठी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा सुरू आहे. परंतु, आता हॉटेल पाठोपाठ लवकरच अभिनेत्री नवीन व्यवसाय सुरू करणार असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच मराठी मनोरंजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे.
हेही वाचा : सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल पुन्हा झालं बंद, अभिनेत्री कारण सांगत म्हणाली, “खवय्यांसाठी…”
अनघा अतुल म्हणाली, “माझ्या भावाची साथ असल्याने मी हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाहीतर मी या व्यवसायाकडे वळले नसते. कारण, या क्षेत्रात १०० गोष्टी असतात याचा अनुभव मला प्रत्यक्ष हॉटेल सुरू करताना आला. मला एकटीने एवढं शक्य झालं नसतं.”
कलाविश्वातील इतर अभिनेत्रींप्रमाणे कपड्यांचा व्यवसाय सुरू करावासा वाटला नाही का? असा प्रश्न अनघाला विचारण्यात आला यावर ती म्हणाली, “शूटिंग सांभाळून हॉटेलसाठी वेळ देणं कठीण आहे त्यामुळे मी एकटी असते, तर याचा विचार नक्कीच केला नसता. मी एक नवा व्यवसाय सुरू केला असता आणि आता लवकरच येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मी तो व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करेन. तो व्यवसाय कोणता असेल याबद्दल मी लवकरच माहिती देईन.” असं स्पष्ट करत अनघाने तिच्या नव्या हॉटेलचं संपूर्ण श्रेय तिच्या कुटुंबीयांना आणि भावाला दिलं आहे.
हेही वाचा : ‘झी मराठी’वरील ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या वेळेत पुन्हा होणार बदल, कारण…
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत अनघा अतुलने खलनालिका श्वेता ही भूमिका साकारली होती. तिचं नवीन हॉटेल सुरू झाल्यावर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने तिच्या या नव्या हॉटेलला उद्घाटनाच्या दिवशी भेट दिली होती.