मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. प्रसाद-अमृता, मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद पाठोपाठ आता छोट्या पडद्यावरची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अभिनेत्री मानसी घाटे घराघरांत लोकप्रिय झाली. नुकताच तिचा विवाहसोहळा पार पडला. मानसीने तिचा अनेक वर्षांपासूनचा प्रियकर आकाश पंडितसह लग्नगाठ बांधली आहे.

मानसी घाटेने स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची जवळची मैत्रीण असलेल्या साक्षीची भूमिका साकारली होती. गेल्या काही दिवसांपासून मानसीच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती. अखेर मालिकेत सौंदर्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी मानसीच्या लग्नातील फोटो शेअर करत या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मानसी व तिच्या नवऱ्याने लग्नासोहळ्यात मराठमोळा लूक केला होता. तिने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी पितांबर आणि त्यावर पुणेरी पगडी परिधान केली होती. अभिनेत्रीचा नवरा आकाश पंडित सुद्धा कलाविश्वाशी संबंधित आहे. तो लाइटिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्याला हर्षदा खानविलकर उपस्थित राहिल्या होत्या.

harshada
हर्षदा खानविलकरांची पोस्ट

दरम्यान, मानसी घाटेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती शेवटची ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती. ही तिची पहिलीच मालिका होती. भविष्यात या अभिनेत्रीला आणखी नव्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader