स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मध्ये नात्यांचे बदलते रंग पाहायला मिळणार आहेत. मालिकेत लीप येणार असून कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कार्तिकला तुरुंगवास होणं हा संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय. काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानकही १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे.
या १४ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र आता दीपाचा वनवास सुरु होणार आहे. मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाहने रिलीज केला आहेत. तो प्रोमो पाहून नेटकरी मालिकेच्या निर्मात्यांना ट्रोल करत आहेत.
“दीपा आणि कार्तिक अमर रहे…मुली २१ वर्षांच्या झाल्या तरी दीपा एकदम फिट…अजब गजब आहे सगळं”, “तुम्हा लोकांना निर्मळ आनंदी कुटुंब नाही का दाखवू शकत… सतत ते नवरा बायको भांडत असतात.. useless..”, “ही खूप निगेटीव्ह मालिका आहे,” असं नेटकरी म्हणत आहेत.
“अवघड आहे या मालिकेचे, साक्षीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? त्यामागे नक्की कोणाचा हात आहे ? हे सगळं गेलं शिमगा करायला, आणि आता हे वेगळच, मालिकेच्या कथानकाला, आणि रंग माझा वेगळाला भावपूर्ण श्रद्धांजली…RIP”, “काय मस्करी आहे राव” अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी या प्रोमोवर करत आहेत.
दरम्यान, मालिकेच्या प्रोमोमध्ये कार्तिक दीपाचा वनवास सुरू होणार असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आलेला कार्तिक आता दीपाला त्रास देण्यासाठी काय करतो, हे आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.