अभिनेत्री अनघा अतुल ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती तिच्या नव्या हॉटेलमुळे चर्चेत आहे. अनघाने तिच्या भावाच्या साथीने नुकतंच पुण्यातील डेक्कन परिसरात नवीन हॉटेल सुरू केलं. या हॉटेलच्या इंटिरियरचा पहिला व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अनघाने हॉटेल सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचं हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं.
हेही वाचा : जॅकी श्रॉफ ते महेश कोठारे ‘या’ कलाकारांनी घेतली मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट; काय आहे कारण?
अनघा अतुलने १९ ऑक्टोबरला पुण्यातील डेक्कन परिसरात तिच्या नव्या हॉटेलचा शुभारंभ केला. या सोहळ्याला कलाविश्वातील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अनघाच्या ‘वदनी कवळ’ या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्धा शाकाहारी पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. अभिनेत्री पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलगी आहे.
अनघाने तिचं नवीन हॉटेल अतिशय विचारपूर्वक आणि हॉटेलच्या जेवणाच्या थीमचा विचार करून सजवलं आहे. ‘वदनी कवळ’ या नावाप्रमाणे तिने हॉटेलमधील एका भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे…’ हा श्लोक लिहिला आहे. हॉटेलमध्ये केळीच्या पानावर साकारलेली नेमप्लेट आणि विठ्ठलाची देखणी मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. याशिवाय एका भिंतीवर अभिनेत्रीने पुणे शहराचे जुने विंटेज फोटो आणि भगरे कुटुंबीयांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो लावले आहेत. हॉटेलमध्ये लाकडी दरवाराजाचं चित्र साकारून त्यावर प्रकाशझोत पाडण्यासाठी आजूबाजूला विविध प्रकारचे लॅम्प लावले आहेत.
हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी अभिनेत्रीने पितळेची जुनी भांडी शोभेसाठी ठेवली आहेत. या भांड्यांमुळे तिच्या संपूर्ण हॉटेलला एक मराठमोळा लूक मिळाला आहे. अनघाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अभिनेत्री शेवटची ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत श्वेता या खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. मालिका संपल्यावर तिने हा नवा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.