आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. गेल्याच वर्षी तिने ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करत बॉलिवूडमध्येही पाऊल टाकलं. तर आता लवकरच तिचा मराठमोळा अंदाज समोर येणार आहे.
रश्मिका मंदानाने तिच्या अभिनयाबरोबरच नृत्याने देखील सर्वांना भुरळ घातली आहे. तर आता पहिल्यांदाच ती तिच्यातला मराठमोळा अंदाज समोर आणत लावणीवर थिरकताना दिसणार आहे. याची माहिती तिने स्वतः दिली.
ती झी चित्र गौरवला हजेरी लावणार आहे. इतकंच नाही तर ती या पुरस्कार सोहळ्यात लावणीही सादर करणार आहे. एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, “मराठी लावणीवर थिरकायचंय? नमस्कार मंडळी. मी तुमची सर्वांची श्रीवल्ली. मी तुम्हा सर्वांचं मन जिंकायला येत आहे झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये.”
आता तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ती पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजा दिसणार असल्याने नेटकरी तिला लावणी करताना पाहण्याची उत्सुकता व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत याबाबत तिचं कौतुकही केलं. हा पुरस्कार सोहळा २६ मार्च रोजी रंगणार आहे. त्यामुळे आता ती कोणत्या गाण्यावर लावणी करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.