‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तर या पर्वाचं सूत्रसंचालन रसिका सुनील करत आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीच्या ऐवजी रसिका सुनील करणार असल्याचे जाहीर होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण त्याच वेळी रसिकाने स्पृहाला एक मेसेज केला आणि त्या मेसेजला स्पृहाने काय उत्तर दिलं हे आता रसिकाने सांगितलं आहे.
रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त केली. त्याबरोबरच काही जणांकडून रसिका आणि स्पृहा यांची सूत्रसंचालिका म्हणून तुलना केली गेली. अशा प्रतिक्रिया येऊ शकतात याचा रसिकाला अजिबातच अंदाज नव्हता.
आणखी वाचा : जो मुलगा सुरुवातीला अजिबात आवडायचा नाही त्याच्याशीच झालं लग्न, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी
कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून रसिकाचं नाव जाहीर झाल्यावर अनेक प्रेक्षकांकडून “सूत्रसंचालिका म्हणून आम्हाला स्पृहाच हवी” अशी मागणी होऊ लागली. पण हा कार्यक्रम रसिकांनी स्वीकारण्याच्या आधी रसिका आणि स्पृहाचं काही बोलणं झालं नव्हतं. सोशल मीडियावरून मिळणारा प्रतिसाद बघून रसिकाने स्पृहाला एक मेसेज केला असल्याचं स्पृहाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. “इतकी वर्ष तू या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खूप छानप्रकारे केलंस. आता ते मी करत आहे. तर तू ते बघ आणि तुझ्याकडून काही टिप्स असतील, काही सुधारणा हव्या असतील तर मला नक्की सांग.” असं रसिकाने त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.
रसिकाने स्पृहाला पाठवलेल्या या मेसेजला स्पृहानेही खूप छान रिप्लाय दिल्याचं रसिका म्हणाली. तिने एका मुलाखतीत सांगितलं, “मी तिला प्रेमाने एक मेसेज केला की, हे तुझं बाळ आहे इतके वर्ष तू त्याला प्रेमाने सांभाळलं आहेस आता मी त्याला सांभाळणार आहे. त्यावर तिचा फार गोड रिप्लाय आला. ती अत्यंत नम्रपणे आणि प्रेमाने बोलली की तुला काहीही कधीही मदत लागली तर मला नक्की सांग. त्यामुळे आमच्यातली ही देवाणघेवाण खूप हेल्दी झाली. मला असं वाटतं की हे आपल्या तिच्या कलाकारांमध्ये फार छानरित्या होत असतं.” त्यामुळे आता रसिका आणि स्पृहामधील हे बोलणं चर्चेत आलं आहे.