‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ असं या पर्वाचं नाव असेल. तर या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत स्पृहा जोशीच्या ऐवजी अभिनेत्री रसिका सुनील दिसणार आहे. पण ही घोषणा करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर भाष्य करत रसिकाने ‘सूर नवा ध्यास नवा’बद्दल स्पृहाशी तिचं बोलणं झालं आहे का याचा खुलासा केला.
रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश कारण आहेत, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त केली आहे. याबरोबरच काही जणांकडून रसिका आणि स्पृहा यांची सूत्रसंचालिका म्हणून तुलना केली जात आहे. अशा प्रतिक्रिया येणार हे रसिकासाठी अनपेक्षित होतं असं ती म्हणाली आहे.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी जेव्हा ‘सूर नवा ध्यास नवा’साठी हो म्हटलं तेव्हा माझ्या डोक्यातही काही आलं नाही की असं काही होऊ शकेल किंवा असं काही होणार आहे. इतका छान कार्यक्रम करायला मिळणार असल्याबद्दल मी खूप उत्सुक होते. यात आपल्याला काय नवीन करता येईल हेच माझ्या डोक्यात होतं. पण आता प्रेक्षकांकडून स्पृहाला ज्या प्रकारचं प्रेम मिळत आहे किंवा माझ्या मनात तिच्याबद्दल जे प्रेम आहे ते पाहून मला असं वाटतंय की मी तिच्याशी बोलायला हवं. तिच्या बाजूने मला काही टिप्स आहेत का किंवा तिला काही बोलायचंय का हे तिला विचारलं पाहिजे. माझं अजून तिच्याशी बोलणं झालं नाहीये पण मी नक्कीच तिच्याशी बोलेन.”
तर ‘सूर नवा ध्यास नवा’चं हे ६वं पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका सुनील करणार आहे तर परीक्षकांच्या भूमिकेत अवधूत गुप्ते आणि महेश काळे दिसतील.