‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. अनेक कलाकार वर्षानुवर्षे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसतात. आता या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे या कलाकारांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या शोमधील दोन कलाकारांनी नुकताच राजश्री मराठीबरोबर संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर तिची चिडचिड झालेली दिसते”

अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर व प्रियदर्शिनी इंदलकर यांनी नुकताच राजश्री मराठीबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांना एकमेकींबद्दल प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी उत्तरे दिली आहेत. रसिकाचा आवडता पदार्थ कोणता? यावर प्रियदर्शिनीने म्हटले, “तिला चॉकलेट केक आवडतो. तीळ-पोळी आवडते”, तर रसिकाने म्हटले, “प्रियदर्शिनीचं मला माहीत आहे, मासे. एकदा ती कुठेतरी गेली होती आणि तिथे तिला भेट म्हणून मासे मिळाले होते, तर त्यानंतर ती खूप खूश झाली होती आणि तिला भेंडीची भाजी खूप आवडते.” त्यांना पुढे विचारण्यात आले की, टोपणनाव आहेत का? यावर ‘रस्सा’ असे रसिकाचे टोपणनाव असल्याचे प्रियदर्शिनीने सांगितले, तर रसिकाने प्रियदर्शनीचे प्रिया, पियू असे टोपण नाव असल्याचे सांगितले. मला असं कळलेलं की, हिची काही जवळची लोकं हिला पियू म्हणतात, तर मी मध्यंतरी तिला पियू म्हणणं सुरू केलं होतं, असे म्हणत रसिकाने प्रियदर्शिनीची टोपणनावे सांगितली.

कोणत्या गोष्टींचा राग येतो किंवा सहन करू शकत नाही? यावर उत्तर देताना “प्रियदर्शिनीला टिशूंचा गैरवापर केला, अतिवापर केला तर तिला अजिबात आवडत नाही; तिला स्वच्छता लागते किंवा प्लास्टिकचा वापर केलेला आवडत नाही. तिला झाडं लावायला आवडतात. या सगळ्या गोष्टी बेशिस्त झाल्या, इकडे-तिकडे झाल्या की ती चिडते आणि ती तिच्या पुणेरी ठसक्यात, सरळ, थेट गोड शब्दात सांगते आणि अर्थात परफॉर्मन्समध्येसुद्धा तिला एखाद्या स्कीटमध्ये जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत ती पोहोचू शकली नाही तर तिची चिडचिड झालेली दिसते. तिचा चेहरा खूप बोलका आहे, त्यामुळे तिची चिडचिड झालेली कळते.” तर रसिकाच्या बाबतीत बोलताना प्रियदर्शिनीने म्हटले, “मला वाटतं रसिकाला स्कीट कोणत्या दिशेने चाललंय आणि या वाक्याचा, पंचचा काय हेतू आहे, हे तिला चांगल्या पद्धतीनं कळतं. तर पाच-सहा जणांच्या स्कीटमध्ये जेव्हा ते गडबडायला लागतं, तेव्हा तिची चिडचिड होते. याबरोबरच रिहर्सलबाबतीत रसिकाची चिडचिड होताना मी पाहिली आहे. तुम्ही रिहर्सलबाबतीत बेशिस्त असू शकत नाही, असे तिला वाटत असतं.”

प्रियदर्शनी इंदलकरने ‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या सेटवरील, शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले होते. एकदा तिने एकाच स्कीटमध्ये दोनदा चुकीच्या वेळी एन्ट्री केल्यामुळे हसं झाल्याची आठवण सांगितली होती. याबरोबरच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या नवीन सीझनसाठी काय तयारी केली आहे, याबद्दलही वक्तव्य केले होते.

हेही वाचा: “देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम असून प्रेक्षकांचा लाडका आहे. आता नवीन सीझनमध्ये काय पाहाय़ला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasika vengurlekar reveals nickname of co actor priyadarshini indalkar maharashtrachi hasyajatra know nsp