Marathi Actress Nupur Chitale : छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. टेलिव्हिजनमुळे तरुण कलाकारांना घराघरांत पोहोचण्याची संधी मिळते. त्यात मालिका लोकप्रिय ठरली तर, एक वेगळा फॅनबेस तयार होतो. मात्र, अनेकदा करिअरच्या शिखरावर असताना अनेक कलाकार मालिकाविश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतात. अशावेळी आपले लाडके कलाकार सध्या काय करत असतील याबद्दलचे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होतात.
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत देविकाची भूमिका साकारणारी नुपूर चितळे सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाली होती. मात्र, २०१८ मध्ये तिने शेवटची मालिका केली अन् पुढे पाच वर्षांसाठी दिल्ली गाठली. ही अभिनेत्री सध्या काय करते याबद्दल जाणून घेऊयात…
‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यामधली सगळी पात्र घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकेत देविकाची भूमिका साकारणाऱ्या नुपूर चितळेने नुकतीच ‘कलाकृती मीडिया’ला मुलाखत दिली. ती सध्या काय करते, मालिकाविश्वातून अभिनेत्रीने मध्यंतरी का ब्रेक घेतला होता. या सगळ्या गोष्टींचा उलगडा नुपूरने या मुलाखतीत केला आहे. ती म्हणाली, “ललितकला केंद्रात मी शिक्षण घेत असताना माझं शेवटचं वर्ष सुरू होतं आणि त्यावेळी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या निर्मात्यांनी माझा परफॉर्मन्स पाहिला. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी ती मालिका सुरू होणार होती. पुढे, मला देविकाची भूमिका मिळाली. ललितकलामधून तिघांची निवड करण्यात आली होती. त्यात मी सुद्धा होते.”
नुपूर पुढे म्हणाली, “मालिका करताना सारखं असं जाणवायचं की, मला काम मिळतंय ही खूपच चांगली गोष्ट आहे. अर्थात, मला कमी वयात चांगल्या भूमिका करता आल्या यासाठी मी कायम ग्रेटफूल आहे. पण, ते काम करताना सारखं मनात यायचं आपण यापेक्षा खूप गोष्टी करू शकतो. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेनंतर मी ‘फुलपाखरू’ मालिका करत होते. त्यावेळी दिल्लीतल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे म्हणजेच NSD चे फॉर्म्स निघाले होते. मी सरांना सांगितलं होतं की, माझी भूमिका आता संपवा कारण मला NSD साठी तयारी करायची आहे. त्यावेळी सगळ्यांचं असं म्हणणं होतं तू काम करते आहेस मग आता परत जाणार आणि आता पुन्हा शिक्षणासाठी का वेळ घेणार आहेस…परत कधी येशील काय काम करशील अशा सगळ्या गोष्टी समोर होत्या. पण, माझे आई-वडील थिएटर करायचे, त्यांच्याकडे पाहून मी NSD ला जाण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शन क्षेत्रात मी स्पेशलायझेशन केलं. खरंतर, मी गेले होते अभिनयासाठी…पण, याआधी मी ललितकला केंद्रात ३ वर्ष अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. म्हणूनच, दुसऱ्या वर्षी मी दिग्दर्शन विषय निवडला.”
“मला NSD मध्ये शिक्षण घेताना खूप छान अनुभव आला. पासआऊट झाल्यावर मी एका नाटकासाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं. ही माझी सुरुवात आहे…आता पुढे अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळून मला काम करायचं आहे. महाराष्ट्राबाहेर शिक्षणासाठी गेल्यावर सुरुवातीला इथल्या गोष्टी खूप जास्त मिस केल्या. कारण, राज्याबाहेर गेल्यावर सगळ्या गोष्टी बदलतात. मी २०१८ मध्ये मालिका करणं बंद केलं आणि त्यानंतर पाच वर्षे NSD मधलं शिक्षण पूर्ण केलं.” असं नुपूरने सांगितलं.
दरम्यान, नुपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत देविका नाईक ही भूमिका साकारली होती. यानंतर ‘फुलपाखरू’ मालिकेत तिने राधा हे पात्र साकारलं होतं. २०१८ मध्ये मालिकाविश्वातून ब्रेक घेत तिने पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्री हळुहळू पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होणार आहे. ‘जलेबी’ या नाटकासाठी तिने दिग्दर्शिका म्हणून काम केलेलं आहे.