Ratris Khel Chale Fame Actress Nupur Chitale : आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घरं खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. रुपाली भोसले, स्वानंदी टिकेकर, अमृता खानविलकर, श्वेता खरात, ऐश्वर्या नारकर या सेलिब्रिटींच्या नव्या घरांची सध्या चांगलीच चर्चा आहे. आता यामध्ये आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे एकूण तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यामध्ये देविकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नुपूर चितळेने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे. पहिल्याच मालिकेमुळे नुपूर प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिने मालिकेत साकारलेल्या सरळसाध्या देविकाच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. आता वैयक्तिक आयुष्यातील एक खास गोष्ट नुपूरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सर्वांना सांगितली आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्या आई- बाबांसह नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

गृहप्रवेश करताना पारंपरिक लूक करत अभिनेत्री नुपूर चितळे तयार झाली होती. आपल्या आई-बाबांच्या साथीने तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आणि त्यानंतर अभिनेत्रीच्या नव्या घरी वास्तुशांती पूजा पार पडली. नुपूरने या फोटोंवर ‘२६ मार्च २०२५’ असं कॅप्शन दिलं आहे. यावरून अभिनेत्रीने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केल्याचं स्पष्ट होत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर मराठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नुपूर चितळेच्या नव्या घरांच्या फोटोंवर सुकन्या मोने, यशोमन आपटे, अश्विनी मुकादम यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. नुपूरच्या नव्या घराचं इंटिरियर खूपच सुंदर दिसत आहे.

दरम्यान, नुपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत देविका नाईक ही भूमिका साकारली होती. यानंतर ‘फुलपाखरू’ मालिकेत तिने राधा हे पात्र साकारलं होतं. २०१८ मध्ये मालिकाविश्वातून ब्रेक घेत तिने पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्री हळुहळू पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होणार आहे. ‘जलेबी’ या नाटकासाठी तिने दिग्दर्शिका म्हणून काम केलेलं आहे.