‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे एकूण तीन भाग पाहायला मिळाले. या तिन्ही भाग प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या मालिकेतील पात्रांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. माई, अण्णा, माधव, दत्ता, अभिराम, छाया, नीलिमा, सरिता, सुषमा, पांडू, शेवंता अशी मालिकेतील सगळी पात्र घराघरात पोहोचली. यामधील एक पात्र चांगलं भाव खाऊन गेलं ते म्हणजे वच्छी. त्यावेळी वच्छीचा डान्स खूप व्हायरल झाला होता. अजूनही तिच्या डान्सचे मीन्स होतं असतात. हीच वच्छी आता परत आली आहे.

अभिनेत्री संजीवनी पाटीलने वच्छीची भूमिका खूप उत्कृष्टरित्या साकारली होती. त्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला होता. आता वच्छी म्हणजे संजीवनी पाटील बऱ्याच वर्षांनंतर मराठी मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे. लोकप्रिय मालिकेत तिची दमदार एन्ट्री झाली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत संजीवनी पाटीलची एन्ट्री झाली आहे. याचा व्हिडीओ ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये संजीवनी हटके स्टाइलमध्ये मशेरीचा डबा खोलताना दिसत आहे. हिरव्या रंगाच्या साडीत ती पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘कलर्स मराठी’नं लिहिलं आहे, “सरकार आणि सानिकाच्या आयुष्यात ही व्यक्ती कोणता नवा ट्विस्ट आणणार?” त्यामुळे आता या नव्या पात्राच्या एन्ट्रीनं ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत पुढे काय घडतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत अभिनेता तन्मय जक्काने सरकारची भूमिका तर अभिनेता सानिका मोजर सानिकाची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा मालिकेत पाहायला मिळत आहे. दररोज रात्री ९.३० ‘#लय आवडतेस तू मला’ मालिका प्रसारित होतं आहे.