Ratris Khel Chale Fame Sanjeevani Patil : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अभिनेत्री संजीवनी पाटील घराघरांत लोकप्रिय लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेल्या ‘वच्छी’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. लॉकडाऊनच्या काळात वच्छीचा डान्स सुद्धा सर्वत्र व्हायरल झाला होता. या अभिनेत्रीने नुकतीच निलेश परब यांच्या एनपी क्रिएशन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी वच्छीने मालिकेत काम करताना आलेला अनुभव तसेच इंडस्ट्रीत कलाकारांना मिळणारं मानधन याविषयी भाष्य केलं आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेविषयी संजीवनी पाटील सांगते, “मी आता माझे काही निकष ठरवले आहेत. मी अडीच-तीन हजारात काम करणार नाही. आज मी हे सर्वांसमोर सांगते आणि मी तेवढ्या पैशात काम करत सुद्धा नाही… समोरच्याला मी नकार देते. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतली वच्छीची भूमिका ही मरणारी होती का? मरण खरंच होतं का त्या भूमिकेला? ती भूमिका खरंच खूप मोठी झाली असती. माझ्यासारखं मालवणी बोलून दाखवा तुम्ही मला, असं मी त्यांना ( सेटवर ) नेहमी बोलायचे. मग वच्छीच्या भूमिकाला मारायची काय गरज होती? कारण, वच्छीने पर-डे मानधन वाढवायला सांगितलं होतं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “आम्हाला प्रसिद्धी मिळतेय फक्त… पण, पैशांचं काय? पोटाचं काय? कारण घरात पण आपल्याला विचारणारे असतात. नवरा पोलीसमध्ये असला तरी, आम्हालाही घर चालवावं लागतं. मला एक कळत नाही ‘हे बजेट आमचं नाही’ असं वाक्य सगळेजण बोलत असतात. मग, ‘या तुम्ही आहे आमचं बजेट’ हे असं बोलायला लोक केव्हापासून शिकणार? चला आमचं बजेट आहे, काम करुया आपण असं कोणीच बोलत नाही. २०१२ मध्ये मी दोन ते अडीच हजारात काम करत होते आणि अजूनही मी तेवढ्याच पैशांमध्ये काम करावं अशी इच्छा असेल तर, मी घरी बसेन, आराम करेन. पण, अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे आपण बाहेर पडतो. २०२४ मध्ये बऱ्याच मालिका ऑफर झाल्या. पण, त्यांची गणितं असतात ना… तीन ते साडेतीन हजारांच्या पुढे जाऊ शकत नाही मग ते काही मला काही जमत नाही. मला पर-डे दहा हजारांची अपेक्षा नाही पण, आपल्या भूमिकेप्रमाणे निदान काहीतरी योग्य मानधन देणं अपेक्षित आहे.”
“आज मी नॅशनल टेलिव्हिजनवर सांगते, वच्छी ही भूमिका मरणारी कधीच नव्हती. पण, तो सीक्वेन्स आणला गेला. वच्छीच्या भूमिकेसाठी मला अवॉर्ड मिळाला होता. तिसऱ्या सीझनसाठी चॅनेलकडून बोलावलं जातं, त्या भूमिकेचं मार्केटिंग केलं जातं. पण, ती परत आल्यावर गोष्टी जुळत नाही मग, त्या भूमिकेला मारून टाकलं जातं. मोठ्या कलाकारांना तुम्ही पर-डे चांगला देता. मग, माझ्यासारख्या मातीतल्या कलाकारांना का डावललं जातं? पण, आता मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. विचार करून काम निवडते आणि येत्या काळात, २०२५ मध्ये मला भरपूर काम करायचं आहे.” असं संजीवनीने सांगितलं.