गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे. अभिनेता हार्दिक जोशी-अक्षया देवधर पाठोपाठ, सुमित पुसावळे-मोनिका महाजन, हरीश दुधाडे-समृद्धी निकम यांनी लग्नगाठ बांधली. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातच आता रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळसकर हिचा लग्नसोहळा पार पडला.
अभिनेत्री कृतिका तुळसकर ही दोन दिवसांपूर्वी दिग्दर्शक विशाल देवरुखकरबरोबर विवाहबद्ध झाली. कृतिकाने त्यांच्या लग्नाचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले होते. “आता ही व्यक्ति संपूर्ण मालकी हक्कानी माझी”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. यात ते दोघेही पारंपारिक वेशात पाहायला मिळाले.
आणखी वाचा : “माझं प्रेम दुसऱ्याचं होताना…” हरीश दुधाडेच्या लग्नानंतर अंकित मोहनची ‘ती’ पोस्ट चर्चेत
तर दुसरीकडे विशाल देवरुखकरने त्यांच्या लग्नातील विधींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो तिच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहेत. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत आहेत. त्याबरोबरच आता कृतिकाने त्यांच्या लग्नातील सप्तपदी घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने तिच्या लग्नातील कपड्यांबद्दल सांगितले आहे.
“सप्तपदी….आमच्या लग्नात मी आणि विशाल ने जे काही सुंदर कपड़े घातलेत ते दीपा ने आमच्या मैत्रीनी ने बनवले होते .तीला काही सांगायची गरज च आम्हाला लागली नाही .तिने आमचा स्पेशल डे अजून स्पेशल बनवला.आमचे सगळे लग्नाचे कपड़े स्वतःच्या हाताने आणि प्रेमाने तयार करण्यासाठी खुप खुप खुप थँक यू… तुम्ही तिच्या बुटीक ला जाऊन खुप छान कपडे बघू शकता आणि तुमच्या स्पेशल डे ला खुप सुंदर दिसू शकता”, असे तिने म्हटले आहे.
दरम्यान दिग्दर्शक विशाल देवरुखकर मराठी सिनेसृष्टीत काम करता करता त्याची ओळख अभिनेत्री कृतिका तुळसकर हिच्याशी झाली. आधी ओळख मग मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत. त्या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले.
दिग्दर्शक विशाल देवरुखकर याने आतापर्यंत अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यातील गर्ल्स, बॉईज, बॉईज २ आणि आता बॉईज २ असे एकामागून एक चित्रपट केले. यातील सर्वच चित्रपट हे चांगलेच सुपरहिट ठरले. विशाल देवरुखकर याने दिग्दर्शनापूर्वी काही एकांकिका देखील केल्या होत्या. तर रात्रीस खेळ चाले मालिकेत अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिने शेवंताची भूमिका करण्यास नकार दिल्यानंतर कृतिका तुळसकर हिची रात्रीस खेळ चाले या मालिकेत एन्ट्री झाली. तिने या मालिकेत शेवंता हे पात्र साकारलं होतं.