Reshma Shinde : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकली. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रेश्माचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. तिच्या लग्नाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती, यामुळेच रेश्माच्या लग्नाला मालिकाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा पहिला गुढीपाडवा नवऱ्यासह साजरा केला आहे. याचा खास व्हिडीओ रेश्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
लग्नानंतर प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करते. तिचा पती पवन हा साऊथ इंडियन आहे. तो आयटी क्षेत्रात काम करतो. लग्नानंतर रेश्माच्या साऊथ इंडियन नवऱ्याने बायकोसह मराठमोळा गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा केला आहे. या व्हिडीओमध्ये रेश्मा आणि पवन दोघंही जोडीने गुढीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रेश्मा यावेळी सुंदर अशी हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसून तयार झाली होती. तर, पवनने बायकोच्या साडीला कॉन्ट्रास होईल असा गडद निळ्या रंगाचा सदरा घातला होता.
पवन आणि रेश्मा दोघंही पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. या जोडप्याने संपूर्ण घरात फुलांची सजावट केली, यानंतर या दोघांनी गुढी उभारली. रेश्मा गुढीपाडव्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “माझा नवरा पवन दक्षिण भारतीय असला, तरी तो हौसेने माझ्याबरोबर या सणाचा आनंद लुटणार आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणार आहोत. सासरी गुढी उभारणं ते नैवेद्यापर्यंत सगळं मी करणार आहे. सासरकडची परंपरा वेगळी असली, तरी सगळेजण माझ्याबरोबर हा सण साजरा करणार आहेत. तसेच मी आणि पवन गुढीपाडव्यासाठी खास मराठमोळा लूक करून नटणार आहोत.”
रेश्माने शेअर केलेल्या गुढीपाडव्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, अनघा अतुल, अभिज्ञा भावे या अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणींनी तिच्या या व्हिडीओचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाते.