Reshma Shinde Husband : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्यावर्षी लग्नबंधनात अडकली. तिचा नवरा साऊथ इंडियन आहे. रेश्मा आणि पवनच्या लग्नाला टेलिव्हिजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. रेश्माचं सासर साऊथ इंडियन असलं तरीही बायकोबरोबर सगळे मराठी सण पवन मोठ्या आनंदाने साजरे करताना दिसतो.

रेश्मा आणि पवनने काही दिवसांपूर्वी लग्नानंतर त्यांचा पहिला गुढीपाडवा साजरा केला होता. या जोडप्याच्या गुढीपाडव्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. आज लग्नानंतर रेश्मा शिंदे पतीचा वाढदिवस साजरा करत आहे. पवनच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून रेश्माने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रेश्मा लिहिते, “मी प्रत्येक दिवशी नव्याने तुझ्या प्रेमात पडते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा My Soulmate पवन” या पोस्टच्या पुढे अभिनेत्रीने “लव्ह, नवरा, My Forever” असे हॅशटॅग दिले आहेत.

रेश्माच्या या पोस्टवर तिची जवळची मैत्रीण व अभिनेत्री अभिज्ञा भावेने मजेशीर कमेंट केली आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पवन. आमच्या रेश्माचा प्रेमाने स्वीकार केल्याबद्दल थँक्यू आणि देव तुझं सदैव रक्षण करो कारण, तुझ्याकडे आता पर्याय नाहीये…” अशी कमेंट करत अभिज्ञाने पुढे हसायचे इमोजी दिले आहेत.

दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला होता. छोट्या पडद्यावरची आघाडीची नायिका म्हणून तिला ओळखलं जातं. सध्या अभिनेत्री ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी हे पात्र साकारत आहे.

तर, रेश्माचा नवरा पवन सिनेविश्वापासून दूर आयटी क्षेत्रात काम करतो. तो गेली सात ते आठ वर्षे युकेमध्ये काम करतोय पण, रेश्मासाठी त्याने आता भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्री यावर म्हणते, “माझ्या कामाचं स्वरुप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं. अभिनय क्षेत्रात मला भारतात राहून जास्त संधी उपलब्ध होतील.”