Reshma Shinde & Pavan Wedding Video : मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू आहे. छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यात अचानक केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर वैयक्तिक आयुष्यात रेश्माने २९ नोव्हेंबरला पनवशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. नुकताच अभिनेत्रीने तिच्या लग्नसोहळ्यातील इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रेश्माच्या ( Reshma Shinde ) लग्नाचे काही विधी मराठमोळ्या पद्धतीने पार पडले. तर, अभिनेत्रीचा नवरा साऊथ इंडियन असल्याने लग्न लागताना रेश्मा आणि पवन यांनी साऊथ इंडियन लूक केला होता. जवळचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत रेश्माचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
रेश्माच्या पतीचा लग्नात हटके इंग्रजी उखाणा
रेश्मा आणि पवन यांनी लग्नात खास एकमेकांसाठी उखाणा देखील घेतले. रेश्मा म्हणाली, “जे स्वप्न पाहिलं होतं ते आज मिळालं… खरं सुख काय असतं हे पवनमुळे कळालं” तर, पवनने आपल्या बायकोसाठी खास इंग्रजीत उखाणा घेतला. “Six Plus Three is Equal to Nine & Reshma is Mine” असा हटके उखाणा घेत पवनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
रेश्मा शिंदेच्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर तिचा पती पवन हा जवळपास गेल्या ७ वर्षांपासून युकेमध्ये आयटी क्षेत्रात काम करतोय. पण, अभिनेत्रीला करिअरमुळे बाहेरगावी शिफ्ट होणं शक्य नाहीये. त्यामुळे पवनने सुद्धा भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्रीने ( Reshma Shinde ) माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
दरम्यान, रेश्मा शिंदेच्या ( Reshma Shinde ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने आतापर्यंत ‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहुल’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. यापैकी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत तिने साकारलेलं दीपा हे पात्र खऱ्या अर्थाने घराघरांत लोकप्रिय झालं. या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या अभिनेत्री ‘घरोघरी मातीच्या चुली’ या कौटुंबिक मालिकेत जानकी हे पात्र साकारत आहे.