Reshma Shinde Wedding Video : छोट्या पडद्यावरची लाडकी अभिनेत्री रेश्मा शिंदे काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. कलाविश्वात तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अभिनेत्रीने केळवणाचे फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. रेश्माचं पहिलं केळवण ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने, तर दुसरं केळवण अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे या अभिनेत्रींनी केलं होतं. यानंतर प्रत्येकाला उत्सुकता होती ती रेश्माच्या लग्नाची.
रेश्मा शिंदे ( Reshma Shinde ) २९ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकली. हळदी समारंभाला अभिनेत्रीच्या नवऱ्याचा पहिला लूक सर्वांसमोर आला. रेश्माच्या पतीचं नाव पवन असं आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्याला मनोरंजनविश्वातील बरीच मंडळी उपस्थित होती. याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर रेश्माच्या लग्नातील एक Inside व्हिडीओ आता सर्वांसमोर आला आहे.
आपल्या लग्नातील हा सुंदर व्हिडीओ रेश्माने सगळ्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. अभिनेत्री यात सुरुवातीला म्हणते, “मी ठरवलं होतं रडायचं नाही. कारण, हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि सुंदर दिवस आहे. त्यात मला माहितीये I made a right choice! त्यामुळे मी नाही रडले.”
लग्नात रेश्माने ( Reshma Shinde ) दाक्षिणात्य लूक केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय ‘सौभाग्यवती भव:’ लिहिलेला पदर डोक्यावर घेऊन अभिनेत्रीने लग्नमंडपात थाटात एन्ट्री केली होती. यावेळी तिच्या जवळच्या मैत्रिणी, आई-बाबा याशिवाय मालिकाविश्वातील तिच्या अनेक मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रेश्मा आणि पवनचं सुंदर बॉण्डिंग या व्हिडीओमध्ये लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा : भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
रेश्मा शिंदेचा पतीसाठी खास मेसेज
लग्न लागताना अभिनेत्री ( Reshma Shinde ) म्हणते माहितीये ना गाणं कोणतं लावायचंय? यानंतर ‘राम राम जय राजा राम’ हे भक्तीगीत या व्हिडीओमध्ये सुरू होतं. यावेळी अनघा अतुल, विदिषा म्हसकर, शाल्मली, हर्षदा खानविलकर या सगळ्यांचे डोळे पाणावल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहेत.
रेश्माने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पवनसाठी एक कन्नडमध्ये मेसेज लिहिला आहे. या व्हिडीओला ‘ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ’ असं कॅप्शन अभिनेत्रीने दिलं आहे. याचा अर्थ ‘आय लव्ह यू किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असा होतो. नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.