Reshma Shinde : ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाला मालिकाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. याशिवाय लग्नाआधी रेश्माचं तिच्या जवळच्या अनेक मित्रमंडळींनी केळवण केलं होतं. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची संपूर्ण टीम, अभिज्ञा भावे व अनुजा साठे या सगळ्यांनी अभिनेत्रीसाठी केळवण आयोजित केलं होतं. याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ रेश्माने यापूर्वीच सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, आता अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
लग्नाआधी रेश्माचं आणखी दोन खास मित्रांनी केळवण केलं होतं. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने आता सर्वांबरोबर शेअर केला आहे. हे दोन जण म्हणजेच प्रतीक्षा मुणगेकर आणि आशुतोष पत्की. प्रतीक्षा व आशुतोष रेश्माबरोबर ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यामध्ये प्रतीक्षा रेश्माच्या ऑनस्क्रीन जाऊबाईंची म्हणजेच ऐश्वर्या रणदिवेची भूमिका साकारत आहे.
जानकी आणि ऐश्वर्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत कायम एकमेकांशी वाद घालताना दिसतात. विशेषत: ऐश्वर्या कायम जानकीविरोधात कुरघोड्या करताना दिसते. ऑनस्क्रीन जानकी आणि ऐश्वर्या कायम एकमेकींविरुद्ध असल्या तरी खऱ्या आयुष्यात रेश्मा आणि प्रतीक्षा यांच्यात खूपच सुंदर बॉण्डिंग आहे.
प्रतीक्षाने लाडक्या मैत्रिणीच्या केळवणासाठी खास तयारी केली होती. सुंदर अशी रांगोळी काढून मधोमध चविष्ट पदार्थांनी भरलेलं ताट खास रेश्मासाठी ठेवलं होतं. याशिवाय अभिनेत्रीच्या केळवणासाठी प्रतीक्षा आणि आशुतोष यांनी दिव्यांची रोषणाई, Bride To Be लिहिलेले फुगे अशी सुंदर सजावट केली होती. रेश्माचं औक्षण करून त्यानंतर या तिघांनी मिळून केक कापल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
“थोडासा उशीर झाला पण, आमचं प्रेम, बॉण्डिंग आणि आठवणी या माझ्याजवळ कायम राहणार आहेत. तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. लव्ह यू प्रतीक्षा आणि आशुतोष” असं कॅप्शन रेश्माने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, रेश्मा शिंदेबद्दल ( Reshma Shinde ) सांगायचं झालं, तर २९ नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनेत्रीने पवनशी लग्नगाठ बांधली. सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.