Reshma Shinde Husband : ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला. तिचं पहिलं केळवण पार पडल्यावर सर्वांच्या मनात रेश्माचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर हळदी समारंभाला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव पवन असल्याचं सर्वांसमोर आलं. मात्र, पवन नेमका काय काम करतो याबद्दल अभिनेत्रीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
छोट्या पडद्यावरची आघाडीची नायिका म्हणून रेश्माला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने अचानक केळवणाचे फोटो शेअर करत सर्वांना गुडन्यूज देणं हा तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. अभिनेत्रीचा लग्नसोहळा एकदम पारंपरिक पद्धतीने पार पडला. कलाविश्वातील तिच्या जवळच्या मित्रमंडळींनी सुद्धा रेश्माच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. या सगळ्यांचं देखील पवनबरोबर तेवढंच सुंदर बॉण्डिंग असल्याचं रेश्माच्या ( Reshma Shinde ) लग्नाचे व्हिडीओ पाहून लक्षात येतं.
रेश्माचा पती पवन काय काम करतो?
रेश्मा शिंदेला पवनबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “पवन हा आयटी प्रोफेशनमधला आहे. तो गेली सात ते आठ वर्षे युकेमध्ये काम करत होता. पण, त्याने भारतात परतण्याचा निर्णय माझ्यासाठी घेतलाय. माझ्या कामाचं स्वरुप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं. अभिनयक्षेत्रात जेव्हा आपण करिअर म्हणून करतो तेव्हा, हा प्रवास खूपच अनिश्चित असतो. त्यामुळे भारतात राहून जास्त संधी उपलब्ध होतील असं मला वाटलं. याशिवाय मी नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केलाय. या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला.”
थाटामाटात लग्न झाल्यावर अभिनेत्री नवऱ्यासह तिच्या सासरी बंगळुरुला गेली होती. याठिकाणी तिचं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं. रेश्माच्या स्वागतासाठी संपूर्ण घरात सुंदर अशी फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशाप्रकारे भव्य स्वागत केल्यामुळे रेश्माने सुद्धा तिच्या सासरच्या लोकांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा : लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार विवाहबंधनात! पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सेलिब्रिटी स्टायलिस्ट
दरम्यान, थाटात लग्नसोहळा पार पडल्यावर आता रेश्मा ( Reshma Shinde ) पुन्हा एकदा सेटवर रुजू झाली आहे. सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी हे पात्र साकारत आहे.