Reshma Shinde : रेश्मा शिंदे व पवन यांचा लग्नसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. रेश्माचा नवरा पवन हा सिनेविश्वापासून दूर आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे तो मालिका पाहतो की नाही? रेश्माच्या मालिका पाहून पवनची प्रतिक्रिया काय असते याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
रेश्मा शिंदेचा पती पवन हा जवळपास गेल्या ७ वर्षांपासून युकेमध्ये आयटी क्षेत्रात काम करतोय. पण, अभिनेत्रीला करिअरमुळे बाहेरगावी शिफ्ट होणं शक्य नाहीये. त्यामुळे पवनने सुद्धा भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्रीने नुकताच माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. पुढे, पवनची मालिका पाहून काय प्रतिक्रिया असते याबद्दल विचारताच रेश्मा म्हणाली, “माझा नवरा साऊथ इंडियन आहे. त्यामुळे तो मराठी किंवा हिंदी मालिका फारशा पाहत नाही. पण, माझ्या मालिकेचे प्रोमो, लहान-लहान शॉर्ट्स या गोष्टी पवन नक्कीच बघतो. त्याला काही छान वाटलं तर, तो आवर्जून माझं, सुमीतचं ( मालिकेतील सहकलाकार ) कौतुक करतो. मी जे काही काम करते ते त्याला प्रचंड आवडतं पण, खरं सांगायचं झालं तर तो मालिका बघत नाही.”
हेही वाचा : जितेंद्र हृतिक रोशनच्या वडिलांबरोबर ४१ वर्षे जुन्या गाण्यावर थिरकले; एकता कपूरचा गर्ल गँगसह ‘ऊ लाला’वर जबरदस्त डान्स, पाहा Video
रेश्मा पुढे म्हणाली, “मी अभिनेत्री होते हे त्याला आधी माहिती नव्हतं. त्याला नंतर समजलं…जेव्हा त्याला समजलं त्याचं असं झालं काय…एकंदर त्याला आश्चर्य वाटलं. कारण, कलाकार किंवा अभिनेता-अभिनेत्री यांना एक वेगळा अॅट्यिट्यूड असतो असा त्याला समज होता. मग, त्याला मी सांगितलं बॉलीवूड आणि हिंदी टेलिव्हिजन हे संपूर्णपणे वेगळंय पण, मराठी सिनेविश्वात एक संस्कृती आहे. आम्ही सगळे एकमेकांबरोबर कुटुंबासारखं राहतो.”
“अम्मांना ( सासूबाई ) माहिती होतं मी क्षेत्रात काम करते. पण, गेल्यावर्षी त्यांचं निधन झालं. म्हणून आम्ही लग्न १ वर्ष पुढे ढकललं. आता आप्पा आहेत… ते मध्ये-मध्ये पाहतात मालिका, आता हिंदीवरून रिलेट करून ते भाषेचा अंदाज बांधतात.” घरी नवऱ्याशी कोणत्या भाषेत गप्पा मारतेस असं विचारल्यावर रेश्माने इंग्रजी-हिंदी असं उत्तर दिलं आणि त्याला मराठी आता थोडंफार येतं असंही अभिनेत्रीने सांगितलं.
दरम्यान, लग्नसोहळा पार पडल्यावर आता पुन्हा रेश्मा शिंदे पुन्हा एकदा कामावर परतली आहे. सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.