Reshma Shinde Pre-Wedding Rituals Mehendi : अभिनेत्री रेश्मा शिंदेने काही दिवसांपूर्वीच केळवणाचे फोटो शेअर करत तिच्या तमाम चाहत्यांना सुखद दिला होता. तिचं पहिलं केळवण ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांनी तर, रेश्माचं दुसरं केळवण ‘लगोरी’ मालिकेतील दोन अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी केलं. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. आता लवकरच प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. रेश्माच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
रेश्माच्या ( Reshma Shinde ) घरात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. केळवणाचे फोटो व्हायरल झाल्यावर अभिनेत्रीचा होणार नवरा कोण आहे, ती नेमकी केव्हा विवाहबंधनात अडकणार या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अखेर अभिनेत्रीने मेहंदी सोहळा पार पडल्याचे फोटो शेअर करत आता येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रेश्माने ( Reshma Shinde ) मेहंदी सोहळ्याला पारंपरिक लूक केला होता. गळ्यात छानसा नेकलेस, मोकळे केस, ट्रेडिशनल ड्रेस या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे. ‘माझी मेहंदी’ असं कॅप्शन देत रेश्माने हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या हातावरच्या मेहंदीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साता जन्माची सात, सनई-चौघडे, नवीन वर-वधू अशी डिझाइन रेश्माच्या मेहंदीत पाहायला मिळत आहे.
रेश्माने अद्याप तिच्या नवऱ्याचं नाव आणि ओळख रिव्हिल केलेलं नाही. त्यामुळे अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विदिषा म्हसकर, प्रतिक्षा मुणगेकर, ऋतुजा कुलकर्णी या अभिनेत्रीच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, तिच्या चाहत्यांनी “तुझा होणारा नवरा कोण आहे”, “नवऱ्याबद्दल तू केव्हा सांगणारेस?” असे प्रश्न तिला कमेंट्समध्ये विचारले आहेत.
दरम्यान, रेश्माच्या ( Reshma Shinde ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी रणदिवे हे पात्र साकारत आहे. यापूर्वी तिने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेद्वारे घराघरांत लोकप्रिय मिळवली होती.