आजवर अनेक मराठी मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः २००० च्या दशकातील मालिका आणि त्यांची शीर्षकगीते प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ‘आभाळमाया’, ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ व ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ अशा अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अनेक मालिकांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात नॉस्टॅल्जिया निर्माण करतात. अलीकडेच ‘आभाळमाया’ मालिकेला २५ वर्षे पूर्ण झाली आणि या मालिकांचे कलाकार एकाच मंचावर आले. आता ईटीव्ही मराठीवरील १५ वर्षांपूर्वीच्या ‘मंथन’ मालिकेतील कलाकारही एकत्र आले आहेत.

शुभांगी गोखले, केतकी थत्ते, सुहिता थत्ते, राधिका विद्यासागर, श्रुजा प्रभुदेसाई या ‘मंथन’ मालिकेतील कलाकारांचे रियुनियन पार पडले. जवळपास १५ वर्षांनी हे सर्व कलाकार एकत्र आले. अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी या मालिकेतील कलाकारांना त्यांच्या घरी निमंत्रित करीत सगळ्यांना विविध पदार्थांची मेजवानी दिली. याच रियुनियनमध्ये या मालिकेतील कलाकारांनी एकत्र बसून गप्पा मारत, गाणी गात जेवणावर ताव मारला. एकमेकांना विविध भेटवस्तू दिल्या. या सर्व गोड आठवणींचा व्हिडीओ ‘गल गल गले’फेम अभिनेत्री केतकी थत्तेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

हेही वाचा…संजनाकडून काय घेऊन जाणार? अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

अभिनेत्री केतकी थत्तेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला. तिने त्याला एक कॅप्शन दिली आणि त्यात लिहिले, “आम्ही साधारण १५ वर्षांपूर्वी ‘मंथन’ नावाची मालिका तयार केली होती. ही मालिका ईटीव्ही मराठीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय डेली सोप होती. काल इतक्या वर्षांनंतर आम्ही सर्व जण पुन्हा भेटलो. ही भेट अगदी अविस्मरणीय होती. वर्षं उलटली असली तरी सगळं काही कालच घडलंय, असं वाटत होतं. गप्पा थांबण्याचं नाव घेत नव्हत्या आणि आम्ही प्रचंड हसत होतो. सुहिता थत्ते यांचे खूप खूप आभार, त्यांनी आम्हाला घरी बोलावलं आणि अप्रतिम मेजवानी दिली. ‘मिसळ’, ‘दहीबुट्टी’, ‘कोथिंबीर वडी’, आणि त्यांचा प्रसिद्ध ‘कणकेचा शिरा’… सगळं काही लाजवाब होतं. खूप मजा आली… गिफ्ट्सची देवाणघेवाण झाली, एकमेकांना खाऊ दिला गेला. असंच आणखी खूप वेळा भेटायचं आहे.”

हेही वाचा…‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता लंडनमध्ये! तिकीट कधी अन् कुठे बुक करायचं?

mathan serial 15 years people commented on this
अभिनेत्री केतकी थत्तेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. (Photo Credit – Ketaki Thatte Instagram)

चाहत्यांची प्रतिक्रिया

या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका चाहतीने लिहिले, “ही आमच्या कुटुंबाची आवडती मालिका होती.” तर दुसऱ्या एका चाहतीने लिहिले, “ही माझी आवडती मालिका होती. मला याचं शीर्षक गीतसुद्धा लक्षात आहे. आणखी एका चाहतीने, “ओहो मस्त मस्त,” अशी कमेंट केली आहे. सध्या अनेक जुन्या मालिकांचे कलाकार एकत्र येत रियुनियन करीत चाहत्यांच्या जुन्या आठवणी जाग्या करीत आहेत.