Indian Idol 13 Winner: ‘इंडियन आयडल’च्या १३ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी २ एप्रिल रोजी पार पडला. ऋषी सिंह या पर्वाचा विजेता ठरला आहे. ऋषी सिंह व्यतिरिक्त, सोनाक्षी कर, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह आणि देवोस्मिता हे फिनालेमधील टॉप स्पर्धक होते. ट्रॉफीसाठी या सर्वांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. पण ऋषी सिंहने सर्वांना मागे टाकत ‘इंडियन आयडॉल १३’ची ट्रॉफी जिंकली.
विजेत्या ऋषी सिंहला ‘इंडियन आयडॉल १३’ च्या ट्रॉफीसह २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार भेट म्हणून मिळाली आहे. याशिवाय त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे. नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हा शो जज करत होते. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या शोला अखेर विजेता मिळाला असून ऋषी सिंहवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे,” असं ऋषीने शो जिंकल्यानंतर म्हटलंय.
ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच गाणी गाण्याची व लिहिण्याची आवड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ऋषी सिंह त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नाही, त्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं, याचा खुलासा खुद्द ऋषीनेच शोमध्ये केला होता. तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून त्याचं शिक्षण पूर्ण करत आहेत.