Bigg Boss Marathi Season 5: छोट्या पडद्यावर गाजणारा आणि वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली होती. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या पाचवा सीझन होस्ट करणार असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांना हा सीझन कधीपासून सुरू होणार? याची उत्सुकता लागली होती. अखेर तारीख ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या चार सीझनला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझननंतर जवळपास दोन वर्षांनी पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पाचवा सीझनचा आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो प्रदर्शित झाला असून यामधून ‘बिग बॉस’च्या घराचं दार कधी उघडणार हे समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: धोतर, डोक्यावर टोपी अन्…; अनंत-राधिकाच्या लग्नातील जॅकी श्रॉफ यांच्या हटके लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसत आहे. प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश वाहवाह करणार…पण जे वाईट वागणार त्यांची तो…एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार…कारण रितेश म्हणतोय, “मी येणार तर कल्ला होणारच”. आपल्या लाडक्या ‘बिग बॉस’ प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीख देखील जाहीर केली आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे ‘बिग बॉस मराठी’चे सुसज्ज आलिशान घर, १०० दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास…फक्त १५ दिवसांत सुरू होणार आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता ‘कलर्स मराठी’वर होणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तसंच जिओ सिनेमा अ‍ॅपवर भाग प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नासाठी जॉन सीनाचा खास भारतीय पारंपरिक लूक, पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस मराठी ५’चा हा जबरदस्त प्रोमो पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अखेर तारीख समोर आली”, “रितेश दादा कल्ला होणार…बरोबर वाजणार”, “थँक्यू रितेश देशमुख”, “व्वा”, “खूप उत्सुक आहोत”, “कडक”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh announced bigg boss marathi season 5 grand premiere date pps