Zee Chitra Gaurav 2025: ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? अभिनेता कोणता? अभिनेत्री कोणती? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघ सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सध्या या सोहळ्यातील बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये रितेश देशमुख भावुक झाल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्यात जितेंद्र जोशी रितेश देशमुखसाठी एका खास व्यक्तीचं पत्र घेऊन आला. ही खास व्यक्ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख. जितेंद्र जोशीने विलासरावांचं पत्र वाचताच रितेश देशमुखला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ ‘मराठी मनोरंजन विश्व’ या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये जितेंद्र जोशी विलासराव देशमुखांचं पत्र वाचतो, “सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्रास कारण की या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलाशी बोलायला कधीपासून कारणांची गरज भासायला लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तुम्हाला माहीतच आहे. त्यांच्याबरोबर तुमचा पहिला मराठी चित्रपट पाहताना खूप भरून आलं. तुमचा ‘माऊली’ पाहताना तर अभिमान वाटतं होता. तुमचं दिग्दर्शक म्हणून पहिलं ‘वेड’ अनुभवलं अन् खात्री पटली यापुढे अशीच आनंदी अनुभूती आम्हाला आणि प्रेक्षकांना देत राहाल.”

“‘तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही ‘वेड’मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं, पण नाही. सूनबाई तुम्हाला अजूनही पुरून उरत आहेत. गंमत बाजूला. पण, रितेश तुम्ही वयानं आणि कर्तुत्वानं कितीही मोठे झालात तरीही आम्हाला दिसतो, तो भावंडांबरोबर बाबळगावच्या विहिरी पोहणारा, गुडघे फोटून सायकलची फेरी मारणारा, मातीत ढोपर सोलवटून गोट्यांचे डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा चिमुरडा. पण, आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवरायांवर चित्रपट घेऊन येताय. परवाच्या तुमच्या लूक टेस्टला मी डोळे भरून पाहिलं आणि डोळे भरून आले,” जितेंद्र जोशीने वाचलेलं वडिलांचं पत्र ऐकून रितेशचे डोळे पाणावले. तो भावुक झाला.

दरम्यान, रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. ८ मार्चला रात्री ७ वाजता ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’मध्ये हा क्षण पाहायला मिळणार आहे.