‘एमटीव्ही रोडीज’ हा भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. या शोची अजुनही तरुणाईत क्रेझ पाहायला मिळते. या शोचे सुरुवातीचे १० पर्व रघु राम व राजीव लक्ष्मण यांनी जज केले होते. त्यापैकी रघुने आता या शोबद्दल मत व्यक्त केलं आहे. ज्यादिवशी आपण तो शो सोडला, त्यादिवशीच तो संपला होता, असं त्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्याने त्याच्या घटस्फोटाला या शोला जबाबदार धरलं आहे.
एमटीव्हीबरोबरच्या क्रिएटिव्ह फरकांबद्दल बोलताना रघु म्हणाला, “मी वैतागलो होतो. त्याची दोन कारणं होती. एक म्हणजे एमटीव्हीला हा शो एका विशिष्ट पद्धतीने बनवायचा होता, जे मला मान्य नव्हतं. १० पर्वापर्यंत तो शो मला हवा तसा मी चालवू शकत होतो, पण नवव्या-१०व्या पर्वात मला लक्षात आलं की माझ्यात व एमटीव्हीत मतभेद आहेत, कारण त्यात त्यांना एका विशिष्ट प्रकारचा अँगल हवा होता.”
रघुने त्याच्या घटस्फोटासाठी शोला जबाबदार धरलं, तसेच मानसिक त्रास झाल्याचंही सांगितलं. “या शोमुळे दुसरी गोष्ट माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडत होती. रोडीजमुळे आणि लोकांच्या क्रेझमुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ सुरू झाली. माझ्या लग्नावर त्याचा परिणाम झाला आणि शेवटी माझा घटस्फोट झाला. माझे मानसिक आरोग्य, माझे शारीरिक आरोग्य दोन्हीवर त्याचा परिणाम झाला. मला पुढे जायचं होतं, त्यामुळे मी तिथे थांबायचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे की मी थांबलो. तो शो सोडल्याचा पश्चाताप मला कधीच झाला नाही,” असं तो म्हणाला. रघु रामने अभिनेत्री सुगंधा गर्गशी लग्न केलं होतं, २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
रघु म्हणाला की त्यांनी शो सोडल्यावर चॅनलने त्याचा भाऊ राजीवला परत येण्यास सांगितलं, पण त्याने नकार दिला. “आम्ही कधीच परत येणार नाही. आम्हाला विचारण्यात आलं होतं, पण मला परत यायचं नाही. मी सोडल्यानंतर कधीच रोडीज पाहिले नाही. हा शो आता ‘तो’ रोडीज नाही. रोडीज नावाचा हा पूर्णपणे वेगळा शो आहे. फॉरमॅटची तुलना आधीच्या रोडीजच्या तुलनेत व्हॉइसशी करणं जास्त योग्य राहील. ज्या दिवशी राजीव आणि मी शो सोडला, तेव्हाच हा शो संपला होता. तो विशिष्ट फॉरमॅट संपला होता,” असं रघू म्हणाला.
“मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं”, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं वक्तव्य
रघू आणि राजीवनंतर रणविजय सिंहने हा शो पुढे नेला, पण दोन वर्षापूर्वी त्यानेही हा शो सोडला. रोडीजच्या शेवटच्या सीझनमध्ये प्रिन्स नरुला, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी हे जज म्हणून दिसले होते, तर सोनू सूद सुपर जजच्या भूमिकेत होता.