रूपा गांगुली हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांनी साकारलेली द्रौपदी. बी.आर. चोप्रा यांच्या महाभारतातली सगळी पात्रं जशी आपल्या मनावर ठसली आहेत तसंच रूपा गांगुलीनी साकारलेलं ‘द्रौपदी’चं पात्रही ठसलं आहे. रूपा गांगुली यांचं हिंदी चांगलं नव्हतं कारण त्या बंगाली आहेत. त्यांना जेव्हा बी.आर. चोप्रांनी द्रौपदीच्या भूमिकेसाठी विचारलं तेव्हाच त्यांना आश्चर्य वाटलं होतं. मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि द्रौपदी अजरामर करुन दाखवली. ‘महाभारत’ या मालिकेचं शुटिंग सुरु असताना अनेक किस्से घडले होते. त्यातले काही किस्से आज आम्ही तुम्हाला रुपा गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त सांगणार आहोत. रूपा गांगुली या सध्या भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. द्रौपदी साकारण्याआधी त्यांनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
कशी मिळाली द्रौपदीची भूमिका?
रूपा गांगुली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “द्रौपदीची भूमिका मला मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. मात्र मला बी. आर. चोप्रांनी फोन केला आणि मुंबईला बोलवून घेतलं. त्यानंतर मी मुंबईत आले. त्यांनी ही भूमिका करणार का विचारलं मी हो म्हटलं कारण मला ते आव्हान वाटलं. जेव्हा मी होकार देऊन परतले तेव्हा मला आनंद झाला पण तितकंच दडपणही आलं होतं. कारण कोलकातामध्ये लोकांना वाटत होतं जर रूपा गांगुलीला ही भूमिका जमली नाही तर कोलकाताचं नाव खराब होईल. सुदैवाने तसं काही झालं नाही.”
एकाच वेळी हसण्याचा आणि रडण्याचा प्रसंग
रूपा गांगुली म्हणाल्या होत्या “माझी स्क्रिन टेस्ट करण्यासाठी मला बी. आर. चोप्रांनी फोन केला. मी त्यावेळी मुंबईतल्या फिल्मसिटी स्टुडिओत आले. मला त्यांनी एकाच वेळी हसायला सांगितलं आणि त्यानंतर रडायलाही सांगितलं. त्यावेळी मला कळलं की ही भूमिका किती आव्हानात्मक आहे. रोज नवी नवी आव्हानं समोर येत होती. मुख्य प्रश्न होता भाषेचा. मी बंगाली असल्याने माझं हिंदी मुळीच चांगलं नव्हतं. त्यामुळे मी तोडकं मोडकं हिंदी बोलायचे. मग पहाटे पाच वाजेपर्यंत डबिंग करायचे. द्रौपदीची भूमिका करणं हे मला आव्हान वाटत होतं आणि मी ते स्वीकारलं होतं. त्यामुळे जोपर्यंत मी सगळं काही योग्यपणे करत नाही तोपर्यंत मी झोपायचेही नाही. “
द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग चित्रीत करताना काय घडलं?
महाभारतातला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग हा सर्वात आव्हानात्मक प्रसंग होता. या प्रसंगाची तयारी रूपा गांगुली यांनी केली. तो प्रसंग असा होता की दुःशासनाच्या भूमिकेत असलेल्या विनोद कपूर यांना रुपा गांगुलीची साडी खेचायची होती. हा प्रसंग एक संपूर्ण शिफ्ट म्हणजेच आठ तास चित्रित होत होता. साडी दातात धरुन ठेवायची आणि देवापुढे हात जोडायचे हे रुपा गांगुली यांना त्या क्षणी सुचलं होतं. जेव्हा दुःशासन साडी खेचू लागतो तेव्हा द्रौपदीच्या दातातलीही साडी सुटते आणि मग ती हात जोडून कृष्णाचा धावा करते असा प्रसंग होता. तो संपूर्ण प्रसंग कॅमेरावर चित्रित करण्यासाठी आठ तास गेले होते. त्यानंतर कृष्णाने साडी पुरवण्याचा प्रसंग हा कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या तंत्राने वापरला गेला होता असंही रुपा गांगुली म्हणाल्या होत्या. यानंतर त्यांना भाषेवरुन कसं हिणवण्यात आलं होतं आणि मग काय झालं तो किस्साही त्यांनी सांगितला.
भाषेवरुन हिणवलं गेलं आणि..
रूपा गांगुली मुलाखतीत म्हणाल्या, “महाभारत मालिकेचं शुटिंग सुरु होऊन बरेच दिवस झाले, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वगैरे पार पडला होता. त्यानंतर एका चित्रीकरणा दरम्यान मला दीड पानाचा संवाद सलग म्हणायचा होता. मात्र एका वाक्यावर मी अडत होते. तिथे आले की मी अडायचे, अडखळायचे..असं घडेपर्यंत ५ वाजले. त्यावेळी सेटवर कुणीतरी बोललं जे मला ऐकू गेलं.. ‘ही बंगाली मुलगी आहे, रसगुल्ला खाणारी हिला थोडंच हिंदी जमणार आहे?’ हे वाक्य मला अस्वस्थ करुन गेलं. पाच वाजता रवि चोप्रांनी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेक दिला आणि मला सांगितलं हे बघ जेव्हा तू तयार होशील तेव्हाच आपण हा प्रसंग चित्रीत करु. मी माझ्या खोलीत गेले, स्वतःला आणि माझ्यातला द्रौपदीला समजावलं की तुला हे करायचं आहेच. द्रौपदी आता तुझ्यापुढे काही पर्याय नाही. त्यानंतर काही वेळाने मी कॅमेरासमोर उभी राहिले आणि एका टेकमध्ये तो संवाद कुठेही न अडखळता म्हटला.”
साहेब या हिंदी सिनेमातून पदार्पण
महाभारत ही मालिका १९८८ ते १९९० या कालावधीत टीव्हीवर सुरु होती. या मालिकेतल्या प्रत्येकलाच त्यावेळी आणि त्यानंतरही अमाप प्रसिद्धी मिळाली. रूपा गांगुली या द्रौपदी म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. रुपा गांगुली यांनी त्यांच्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८५ मध्ये आलेल्या ‘साहेब’ या सिनेमापासून केली. मात्र जेव्हा महाभारत टीव्हीवर आलं तेव्हा त्यांच्याकडे अनेक भूमिका आल्या. तरीही त्यांनी पुढे निवडकच भूमिका केल्या. अपर्णा सेन यांचा ‘युगांत’, गौतम घोष यांचा ‘आबार अरण्ये’, रितुपर्णो घोष यांचा ‘आंतरमहाल’ या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या. तसंच त्यांनी टीव्हा मालिकांमध्येही काम केलं. रुपा गांगुली यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९६६ ला झाला. हिंदी आणि बंगाली भाषेतल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. रुपा गांगुली या मॅकेनिकल इंजिनिअर आहेत आणि सध्या राज्यसभेच्या भाजपाच्या खासदारही आहेत. त्यांच करीअर अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरलं. मात्र त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात समस्या निर्माण झाल्या हे देखील वास्तव आहे.
व्यक्तीगत आयुष्यातलं महाभारत
१९९२ मध्ये रूपा गांगुली यांनी ध्रुब मुखर्जींशी लग्न केलं. ते मॅकेनिकल इंजिनिअर होते. ‘सच का सामना’ या कार्यक्रमात रुपा गांगुली जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ध्रुब यांच्याशी लग्न झाल्यावर मी अभिनय करणं काही काळासाठी सोडलं आणि पतीसह कोलकाता या ठिकाणी राहू लागले. पण तेव्हा आमच्यात खूप मतभेद झाले. ज्यानंतर मी तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. रोजच्या खर्चासाठी माझे पती मला पैसेही देत नसत असंही त्या म्हणाल्या होत्या. शेवटी २००६ मध्ये त्या ध्रुब यांच्यापासून विभक्त झाल्या.
लिव्ह इन मध्ये राहिल्या रूपा गांगुली
ध्रुब मुखर्जी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर दिब्येंदू नावाचा मुलगा रूपा गांगुली यांच्या आयुष्यात आला. १३ वर्षांनी लहान असलेल्या दिब्येंदूच्या प्रेमात रूपा गांगुली पडल्या आणि त्याच्यासह लिव्ह इन मध्ये राहू लागल्या. त्यांच्या या निर्णयाची बरीच मसालेदार चर्चा तेव्हा माध्यमांनी रंगवली होती.
सिगारेट ओढतानच्या फोटोमुळे वाद
रूपा गांगुली यांचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो काही महाभारत मालिकेच्या नंतर काही वर्षांनी प्रसिद्ध झाला होता. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र या टीकेकडे रूपा गांगुली यांनी फारसं लक्ष दिलं नाही. त्या नैराश्यातून व्यसनाच्या आहारी गेल्या होत्या असंही त्यावेळी त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितलं होतं.
रुपा गांगुली यांचं व्यक्तीगत आयुष्य काहीसं खडतर गेलं असलं तरीही त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून आता सक्रिय आहेत. तसंच त्या उत्तम गाणंही म्हणतात. ‘महाभारत’ मालिकेतली द्रौपदी अजरामर करणाऱ्या रुपा गांगुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!