गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर, गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं आपण पाहिलं. आपल्याकडे आपल्या हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाला वाटतं. मनोरंजनविश्वातील अशाच एका अभिनेत्रीची ही दोन्ही स्वप्नं पूर्ण झाली आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. काही दिवसांपूर्वीच तिने नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अभिनेत्रीने एक नवी गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. रुचिराने तिच्या आई-वडिलांना खास सरप्राईज देत नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे.

हेही वाचा : कलर्सची ‘ही’ लोकप्रिय मालिका वर्षभरातच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष

रुचिराने तिच्या नव्या गाडीचं नाव ‘सुवर्णरथ’ असं ठेवलं आहे. गाडी घेतल्यावर पहिल्याच दिवशी अभिनेत्री तिच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर इस्कॉन मंदिरात गेली होती. याठिकाणी रुचिराने कुटुंबीयांना नवीन गाडी घेतल्याचं सरप्राईज तिच्या आई-वडिलांना दिलं. अभिनेत्रीचे बाबा लेकीने नवीन गाडी घेतली म्हणून भारावून गेल्याचं सर्वप्रथम या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. तर, रुचिरा आई भावुक झाली होती.

रुचिरा आणि तिच्या बाबांनी नव्या गाडीची पूजा करून सर्वांना पेढे वाटल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, मला माहितीये स्वप्न कशाप्रकारे पाहिली जातात अन् हे सुद्धा माहितीये की, ही स्वप्न पूर्ण झाल्यावर आपण कसे भारावून जातो. “पप्पा, आपली गाडी” असं सांगत मी जेव्हा गाडीच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या तेव्हा माझ्या वडिलांची सुद्धा अशीच काहिशी प्रतिक्रिया होती. माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहण्यासाठी मी किती वेळ वाट पाहिली हे फक्त मला, माझा कृष्ण आणि मी कष्ट केलेल्या त्या सगळ्या रात्रींना हे माहिती आहे.

हेही वाचा : ‘कर्मवीरायण’ येत्या शुक्रवारी रूपेरी पडद्यावर; अभिनेता किशोर कदम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भूमिकेत

“तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या मार्गावर चाला, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि सदैव तुमच्या आई-बाबांचा विचार करा म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल” असं रुचिराने या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : पुन्हा एकदा गोष्ट बालाकोट हवाई हल्ल्याची…

दरम्यान, नवीन गाडी घेतल्याबद्दल सध्या रुचिरा जाधववर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती ‘ठरलं तर मग’ मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruchira jadhav bought new car shares video with her parents sva 00