Rujuta Deshmukh Daughter Sajiri joshi: रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील (कृष्णा) आर्यन मेंगजी, प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर हे त्रिकुट प्रेक्षकांसमोर आले. या तिघांची गाण्यातून, टीझरमधून सर्वांशी ओळख होत असतानाच एक पाठमोरा चेहरा यात सतत दिसत होता आणि हा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता हा चेहरा समोर आला आहे. तर हा चेहरा आहे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्रीण जाईचा. त्यामुळे आता ही गँग एकत्र आल्याने ‘एप्रिल मे ९९’ ची सुट्टी अविस्मरणीय ठरणार हे नक्की!

जाईची भूमिका साकारणारी साजिरी जोशी ही अभिनेत्री ऋजुता देशमुखची मुलगी असल्याने अभिनयाचा वारसा तिला आईकडूनच मिळाला आहे. सध्या ऋजुता देशमुख ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काव्या-नंदिनीच्या सासूबाईंची भूमिका साकारत आहे. ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हुशार, समजुतदार, गोड, दिलखुलास अशी जाई या तीन मित्रांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करताना दिसत आहे.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी मी साजिरीची ऑडिशन घेतली होती. परंतु, त्या व्यक्तिरेखेशी ती मिळतीजुळती नसल्याने तिची निवड झाली नाही. तिची निरागसता, कुरळे केस, बोलके डोळे, हावभाव माझ्या लक्षात राहिले. त्यामुळे हे माझ्या मनात होतेच, की जेव्हा मी एखादा चित्रपट बनवेन तेव्हा साजिरीला नक्की एखादी भूमिका देणार. ‘एप्रिल मे ९९’ बनवताना साजिरीलाच डोक्यात ठेवून ‘जाई’ची व्यक्तिरेखा लिहिण्यात आली. तिच्या अभिनयात सहजता व नैसर्गिकता असल्याने जाई अनेकांना आपल्यातलीच एक वाटेल. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले तशीच जाईही प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ एप्रिल मे ९९ हा प्रत्येकाला नोस्टालजिक अनुभव देणारा चित्रपट आहे. त्यासाठी आम्हाला तीच निरागसता, खट्याळपणा असलेले चेहरे हवे होते आणि आर्यन, श्रेयस, मंथन व साजिरी यासाठी योग्य निवड आहे. साजिरीचे गोड हास्य, उत्तम अभिनय संपूर्ण चित्रपटाला ताजेपणा देतो.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केलं असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून हे या सिनेमाचे निर्माते आहेत, तर लॉरेन्स डिसोझा सह-निर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.