मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार कामानिमित्त किंवा कुटुंबासाठी मुंबई-पुणे असा दैनंदिन प्रवास करतात. बरेच कलाकार मूळचे पुण्याचे असून केवळ कामासाठी मुंबईला स्थायिक झाले आहेत. या कलाकारांना मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना वाहतूक कोंडी, जास्तीचा टोल असे अनेक अनुभव येतात. असाच अनुभव अभिनेत्री ऋजुता देशमुखला मुंबईहून पुण्याला जाताना आला. तिच्याबरोबर नेमके काय घडले हे सांगण्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री ऋजुता देशमुखचे माहेर पुण्यात आहे. परंतु, लग्नानंतर आज जवळपास २५ वर्ष ऋजुता मुंबईला राहते. तिच्या आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना भेटण्यासाठी ती अनेकदा पुण्याला जाते. महामार्गावरून प्रवास करताना तिला काय अनुभव आला याविषयी सांगताना ऋजुता म्हणते, “३१ जुलैला मी, माझी मुलगी आणि नवरा शिरीष आम्ही तिघे पुण्याला निघालो होतो. आम्ही पुण्याला जाताना वाटेत लोणावळ्याला अनेकदा थांबतो. तिथे चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि तुम्हाला माहित आहे की, टोलचे मेसेज किंवा मेल्स मोबाइलवर उशिराने येतात.”
हेही वाचा : “त्याला अभिनय क्षेत्रातील मुलीशी लग्न…”, स्पृहा जोशीने सांगितला नवऱ्याबद्दलचा किस्सा; म्हणाली…
ऋजुता पुढे म्हणाली, “सामान्यपणे मुंबई-पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर २४०रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर ८० रुपये टोल घेतला जातो. मी पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता, त्यामध्ये खालापूरला २४० आणि तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये वजा करण्यात आले होते, म्हणजे एकूण ४८० रुपये टोल गेला होता. याची मी रितसर तक्रार केली पण, अजून मला त्याचे उत्तर मिळालेले नाही. दुसऱ्या दिवशी (१ ऑगस्ट) पुन्हा मुंबईला जायला निघाले तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून मी तेथील मॅनेजरला भेटले. तेव्हा त्याने मला सांगितले, “मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापण्यात आला आहे. आता मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० असे दोन भाग झाले आहेत. जेव्हापासून फास्ट टॅग सुरु झाला तेव्हापासून हे सुरु झाले असे ते म्हणाले.”
हेही वाचा : “आताचे अभिनेते अंगावरचे केस…”, बॉलीवूडमधील बदलांविषयी सनी देओलने मांडले स्पष्ट मत; म्हणाला…
“टोलच्या मॅनेजरने मला दोन टप्पे केल्यामुळे असा टोल कापल्याचे सांगितले. खरेतर मुंबई ते लोणावळा ८३ किलोमीटर अंतर आहे तर, लोणावळा ते पुणे ६४ किलोमीटर अंतर आहे. फक्त लोणावळ्याला थांबले म्हणून दुप्पट टोल? मला अजून कशाचे उत्तर मिळालेले नाही. अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आले, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?” असा प्रश्न अभिनेत्री ऋजुता देशमुखने या व्हिडीओमार्फत उपस्थित केला आहे.
दरम्यान, ऋजुताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट करून त्यांनाही असाच अनुभव आल्याचे नमूद केले आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये एमएमआरडीए, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.