मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार कामानिमित्त अथवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर दैनंदिन प्रवास करतात. या प्रवासादरम्यान आलेला अनुभव अलीकडेच अभिनेत्री ऋजुता देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला होता. मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळ्याला थांबल्यामुळे अभिनेत्रीला दुप्पट टोल आकारण्यात आला होता. यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून ऋजुताने संताप व्यक्त केला होता.
ऋजुता देशमुख तिच्या कुटुंबासह ३१ जुलैला पुण्याला जात होती. पुण्याला जाताना खालापूर आणि तळेगाव असे दोन टोलनाके लागतात. खालापूरचा टोल भरल्यावर पुढे अभिनेत्रीने लोणावळ्यात नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतला. लोणावळ्याला थांबून पुढचा प्रवास केल्याने तिला तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये टोल आकारण्यात आला असे तिला टोल व्यवस्थापकांनी सांगितले. हे नियम केव्हा बदलले? तसेच प्रत्येकाला वेगवेगळे नियम का? असा संतप्त सवाल यानंतर तिने एक व्हिडीओ शेअर करत केला होता. या संपूर्ण घटनेनंतर नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपल्या सहकलाकारांसह मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास केला.
नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना अभिनेत्रीला काहीसा वेगळा अनुभव आला. याविषयी तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. ऋजुता महामार्गावरील व्हिडीओ शेअर करत लिहिते, “माझं आणि या महामार्गाचं एक घनिष्ट नात होत चाललंय…आज आमच्या नाटकाची बस पंक्चर झाली.” या व्हिडीओमध्ये तिने महामार्गावर पंक्चर झालेली बस दाखवली आहे. या महामार्गावरून प्रवास करताना पुन्हा एकदा त्रास झाल्याचे अभिनेत्रीला या सोशल मीडिया पोस्टमधून सूचित करायचे आहे.
हेही वाचा : “दिग्पालने माझ्या नकळत त्यांना…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितला सून आणि लेकासह एकत्र काम करण्याचा अनुभव
दरम्यान, अभिनेत्री ऋजुता देशमुखप्रमाणे अन्य काही कलाकार आणि सामान्य माणसांना मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना टोल संदर्भात असाच काहीसा अनुभव आल्याचे आता समोर आहे. या सगळ्यांनी अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.