Marathi Actress Rupali Bhosale : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, आजही या मालिकेतील कलाकार घराघरांत चर्चेत असतात. या मालिकेत संजना या खलनायिकेची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारली होती. खलनायिकेचं पात्र असूनही अभिनेत्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रुपाली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

रुपाली भोसले उत्तम स्वयंपाक बनवते ही गोष्ट तिच्या सगळ्याच चाहत्यांना माहिती आहे. याशिवाय अभिनेत्री जेव्हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाली होती तेव्हा सुद्धा तिचं पाककौशल्य सर्वांना पाहायला मिळालं होतं. रुपाली तिच्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ मिळाला की, तिच्या घरी काही ना काही पदार्थ करत असते. नुकताच तिने उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, हे मोदक अभिनेत्रीने तिच्या आईला त्यांच्या नव्या व्यवसायात मदत व्हावी म्हणून बनवले आहेत.

रुपालीच्या आईने घरगुती जेवणाच्या ऑर्डरचा व्यवसाय सुरू केला आहे. भविष्यात क्लाऊड किचन किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं हे त्यांचं स्वप्न आहे. नुकतीच अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना १०० उकडीच्या मोदकांची ऑर्डर मिळाली होती. हे मोदक बनवतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“गणपती बाप्पा मोरया… आम्ही सुरू केलं आणि करून दाखवलं… १०० उकडीच्या मोदकांची ऑर्डर पूर्ण केली.” व्हिडीओला असं कॅप्शन देत रुपालीने पुढे “नवीन सुरुवात, क्लाउड किचन” हे हॅशटॅग दिले आहे. दरम्यान, रुपालीच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, आईच्या व्यवसायाबद्दल रुपाली म्हणाली होती, “माझ्या आईने जेवणाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. आता मी घरी असल्यामुळे आईला मदत करू शकतेय. आमचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे… एखादं क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं. बघु आता ते कधी सुरू होतंय…पण, त्याआधी माझ्या आईला या नवीन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!”

Story img Loader