‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आता त्या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. नुकतंच प्रथमेश लघाटेचे पहिलं केळवण पार पडलं. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
प्रथमेश लघाटेने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे त्याचे केळवण आयोजित केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत ‘चतुरंग प्रतिष्ठान’मधील काही महिला या त्याला ओवाळताना दिसत आहे. त्याबरोबरच त्याला शाल भेट म्हणून दिल्याचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “ते दोघेही आजही तसेच दिसतात आणि मी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, प्रिया बापट म्हणाली…
यानंतर त्याने जेवणाच्या ताटाचा फोटो पोस्ट केला आहे. प्रथमेशला चांदीच्या ताटात वरण, भात, पूरणपोळी, श्रीखंड, कांदाभजी असे त्याच्या आवडीचे पदार्थ केळवणासाठी वाढण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी प्रथमेशने उखाणाही घेतला.
“वाढलेलं पान रिकामी केलं एक एक घास घेत घेत, चतुरंगच्या कार्यालयामध्ये माझ्या जेवणाचा फक्कड जमला बेत”, असा हटके उखाणा त्याने केळवणावेळी घेतला. त्याने या व्हिडीओला कॅप्शन देताना सर्वांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : Video : “आपल्या बापाने…”, ईडीच्या कारवाईनंतर लेकीच्या प्रतिक्रियेबद्दल संजय राऊतांनी केला खुलासा
“आमचं ठरलंय” च्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग” ने केला त्याबद्दल चतुरंग च्या पूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद!, असे कॅप्शन प्रथमेश लघाटेने या व्हिडीओला दिले आहे.
दरम्यान प्रथमेश लघाटेच्या केळवणाच्या व्हिडीओ अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेली त्या दोघांची मैत्री आजही कायम आहे. आता त्यांनी या मैत्रीला पुढे नेण्याचा निर्णय घेत प्रेमाची कबुली दिली. प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर करत त्यांचं नातं जाहीर केलं होतं