Khushboo Tawde Welcomed Baby Girl : मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका सोडली. तेव्हाच खुशबू दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. खुशबूने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील मंजुषा म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे.
अभिनेत्री खुशबू तावडेचं २०१८ साली अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव राघव आहे. खुशबू व संग्रामचा पहिला मुलगा राघव आता ३ वर्षांचा आहे. त्यानंतर आता खुशबूच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री वैशाली भोसलेने खुशबूबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “मुलगी झाली…अभिनंदन.”
हेही वाचा – ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, पाच दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
ऑगस्ट महिन्यात खुशबूचं घरच्याघरीच साध्या पद्धतीने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दुसरं डोहाळे जेवण पार पडलं होतं. यावेळी संग्राम गैरहजर होता. कारण ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील चित्रीकरणाचा संग्रामचा पहिला दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मुलगा की मुलगी हा ओळखायचा खेळ घेतला. तेव्हा खुशबू व संग्रामने पेढ्याची वाटी उघडली. यावरून खुशबू पुन्हा एकदा गोंडस चिमुकल्याला जन्म देणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. आज खुशबूला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
हेही वाचा – भाचा कृष्णा अभिषेकने गोविंदाच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची माहिती, म्हणाला, “मामाची प्रकृती…”
दरम्यान, खुशबू तावडेबद्दल बोलायचं झालं तर, डोंबिवलीत जन्म झालेल्या खुशबूने बीएससीमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘एक मोहोर अबोल’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘देवयानी’, ‘आम्ही दोघी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ अशा अनेक मराठी-हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका खुशबूने साकारल्या आहेत.