‘स्वामिनी’, ‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’ अशा एकापेक्षा लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. आजवर त्यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा कलाविश्वात उमटवला आहे. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्रीने आज मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ऐश्वर्या नारकरांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्या दैनंदिन जीवनात काय काय करतात? याचे अपडेट्स नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. सकाळी योगा आणि व्यायाम करून त्यांच्या दिवसाची दररोज सुरुवात होते. ऐश्वर्या यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतींमध्ये योगा अन् व्यायाम केल्याने शरीराला कसा फायदा होतो याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
ऐश्वर्या नारकर वयाची पंचेचाळीशी ओलांडली तरीही आजही तेवढ्याच फिट आहेत. त्यांचं सौंदर्य आणि फिटनेस आजच्या तरुण मुलींना लाजवेल असा आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्यांचं नेहमीच सर्वत्र कौतुक केलं जातं. ऐश्वर्या यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक नकारात्मक पात्र सुद्धा साकारली आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. अभिनेत्रीच्या सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत अभिनेत्रीने रुपाली हे नकारात्मक पात्र साकारलं आहे. याशिवाय त्या इन्स्टाग्रामवर विविध रील्स व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.
हेही वाचा : Video : नवरा हाच हवा! अक्षरा-अधिपतीचं वटपौर्णिमा विशेष गाणं पाहिलंत का? मास्तरीण बाईंनी केलाय झकास डान्स
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आपले हे आवडते कलाकार लहानपणी नेमके कसे दिसायचे याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. बालदिवस किंवा जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हे कलाकार बालपणीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ऐश्वर्या नारकर लहानपणी नेमक्या कशा दिसायच्या याची उत्सुकता देखील प्रत्येकाला आहे. नुकताच ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता.
ऐश्वर्या नारकर या फोटोमध्ये परकर आणि छानसा ब्लाऊज घालून गोड अशा हसताना दिसत आहेत. हा त्यांचा फोटो ब्लॅक अँड व्हाइट स्वरुपात आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा हा बालपणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भविष्यात त्यांना प्रेक्षक आणखी नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.