मालिकेच्या शूटिंगदरम्यान अनेक कलाकारांचे एकमेकांबरोबर खास बॉण्डिंग तयार होते. सुरुवातीला अनोळखी असणारे काही चेहरे कालांतराने ओळखीचे होतात आणि त्यांचं एकमेकांशी घट्ट नातं तयार होतं. कलाकारांचा हा खास बॉण्ड सोशल मीडियावरील व्हिडीओमधून अनेकदा पाहायला मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे मालिकेने निरोप घेतल्यानंतरही अनेक कलाकार एकमेकांना भेटत असतात. असेच काही कलाकार मालिकेच्या निरोपानंतर भेटले आहेत आणि हे कलाकार म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Saatvya Mulichi Saatvi Mulgi) मालिकेतील अभिनेत्री.
झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०२२ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने २०२४ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, अमृता रावराणे, राहुल मेहेंदळे, अजिंक्य ननावरेसह अनेक कलाकार पाहायला मिळाले. गेल्या वर्षी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील कलाकार कायमच चर्चेत राहत असतात.
तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, सुरूची अडारकर, अमृता रावराणे व एकता डांगर या अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर अभिनेत्री आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. शिवाय त्यांच्या कामानिमित्तची माहितीही शेअर करत असतात. अशातच या अभिनेत्रींनी नुकतीच एकमेकींची भेट घेतली आणि या भेटीचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तितीक्षाने या भेटीचे खास क्षण आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या अभिनेत्रींनी एकमेकींबरोबर खाणं-पिणं आणि मजामस्ती केली. या अभिनेत्रींनी एकमेकींबरोबर खास क्षण एन्जॉय केल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. तितीक्षाने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच काही कलाकार मंडळींनीदेखील या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत तितीक्षाने नेत्रा ही भूमिका साकारली होती. नेत्राला पुढे काय होणार?, कोणाच्या आयुष्यात काय घडणार?, कोणते संकट येणार? याचे संकेत मिळत असत. तर ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेत सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. रूपाली, विरोचक, मैथिली अशा भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी साकारल्या होत्या.