‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satvi Mulgi) या मालिकेने जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०२२ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने २०२४ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, अमृता रावराणे, राहुल मेहेंदळे, अजिंक्य जोशी अशी स्टारकास्ट पाहायला मिळाली. आता ही मालिका पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘मराठी टेली स्पाय’नुसार सातव्या मुलीची सातवी मुलगी झी चित्रमंदिर या चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. ‘झी चित्रमंदिर’ हे एक फ्री टू एअर चॅनेल आहे. हे चॅनेल मोजक्याच डीटीएच प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. १७ फेब्रुवारीपासून दररोज रात्री ८ वाजता झी चित्रमंदिर या चॅनेलवर ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित केली जाणार आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेविषयी बोलायचे, तर तितीक्षा तावडेने यामध्ये नेत्रा ही भूमिका साकारली होती. नेत्राला पुढे काय होणार, कोणाच्या आयुष्यात काय घडणार, कोणते संकट येणार याचे संकेत मिळत असतात. त्यामुळे तिने अनेक संकटांतून कुटुंबाचे रक्षण केल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला अद्वैतचे संरक्षण करण्यासाठी आलेल्या नेत्राचे पुढे त्याच्याबरोबर लग्नही होते. त्यांना ईशा व रीमा या मुली असल्याचे मालिकेत पाहायला मिळाले होते. त्याबरोबरच या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी साकारलेल्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही भूमिका पाहायला मिळाल्या. रूपाली, विरोचक, मैथिली अशा भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी साकारल्या होत्या. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, मालिकेच्या शूटिंगदरम्यान यातील कलाकारांचे बॉण्डिंग सोशल मीडियावरील व्हिडीओमधून पाहायला मिळत होते. महत्त्वाची बाब म्हणजे मालिकेने निरोप घेतल्यानंतरही ते एकमेकांना भेटत असल्याचे दिसते. अनेकदा हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता हे कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saatvya mulichi saatvi mulgi rerelease on zee chitramandir know details nsp