छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. गेले अनेक महिने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आला आहे. पण आता या कार्यक्रमाला ब्रेक लागणार असून त्या जागी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची लोकप्रियता खूप प्रचंड आहे. तर आता त्याच जागी सचिन खेडेकर यांचा ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रम सुरू होणार असल्याने त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अनेक कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख दिली. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचं नेहमीच भरभरून प्रेम मिळत असतं. पण आता त्याची जागा ‘कोण होणार करोडपती’ घेणार असल्याने सचिन खेडेकर यांना भीती वाटत आहे, असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला लागणार ब्रेक, कारण सांगत कलाकार म्हणाले…

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची जागा मी घेणार असल्याने, मी ट्रोल होईन याची मला खूप भीती वाटत असते. कारण तो कार्यक्रम खूप लोक बघतात आणि तो प्रचंड लोकप्रिय आहे. त्या सगळ्यांना सुट्टी देऊन तुम्ही ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम का सहा दिवस दाखवत आहात? असं म्हणून लोकांनी मला गेल्या वर्षी खूप ट्रोल केलं होतं. त्यामुळे मी लोकांना प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो की, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’प्रमाणेच ‘कोण होणार करोडपती’देखील मी दुप्पट मनोरंजक करण्याचा प्रयत्न करेन आणि ती सगळी मंडळी वर्षभर तुमचं मनोरंजन करतात, त्यामुळे दोन महिने हक्काची सुट्टी हा त्यांच्याही स्वातंत्र्याचा भाग आहे इतकं तुम्ही लक्षात ठेवा आणि आमचा हा नवीन कार्यक्रम बघा.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘हा’ अभिनेता सुरू करणार नवी इनिंग, झळकणार भाऊ कदम यांच्याबरोबर

दरम्यान, ‘कोण होणार करोडपती’चं हे नवीन पर्व २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आधीच्या पर्वांप्रमाणेच अभिनेते सचिन खेडेकर या पर्वाचं सूत्रसंचालन करताना दिसतील.

Story img Loader